भीमेचे पाणी ओसरले पण, पूल खचल्याने वाहतूक बंद

संजय काटे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

-  भीमा नदीच्या पाण्याचा विसर्ग काल रात्रीपासून कमी झाल्याने निमगावखलु येथील नगर- दौंड रस्त्यावरील पूल सकाळी वाहतुकीला खुला झाला.

- मात्र काही भागात पूल खचल्याचे लक्षात आल्याने प्रशासनाने या पुलावरील वहातुक बंद केली आहे.

श्रीगोंदे : भीमा नदीच्या पाण्याचा विसर्ग काल रात्रीपासून कमी झाल्याने निमगावखलु येथील नगर- दौंड रस्त्यावरील पूल सकाळी वाहतुकीला खुला झाला. मात्र काही भागात पूल खचल्याचे लक्षात आल्याने प्रशासनाने या पुलावरील वहातुक बंद केली आहे.

भीमा नदीचा सव्वादोन लाख क्यूसेक्सचा कालचा विसर्ग आज एक लाख तीस हजारावर आल्याने सकाळपासून निमगावखलु येथील पुलावरून वाहनांची वहातुक सुरू झाली होती. दुचाकींसह छोटी वाहने पुलावरून सुरू झाली मात्र मध्यभागी पूल खचल्याचे लक्षात आल्याने घाईने ही वहातुक बंद करण्यात आली.

श्रीगोंदयाचे तहसीलदार महेंद्र माळी म्हणाले, पुराच्या पाण्याने पुलाचा काही भाग तुटला आहे. त्याबाबत बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा पूल बंद करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. बांधकाम विभागाचे अधिकारी पुलाची पाहणी करणार असून त्यानंतर वहातुक कधी सुरू होईल याबाबत निर्णय घेऊ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhima's water is silent, but the traffic is stopped due to the bridges