भीमसेनी कापराला भलताच भाव; इतकी झालीय वाढ

अजित कुलकर्णी
Monday, 14 September 2020

भीमसेनी कापरालाही कधी नव्हे ते महत्त्व आलेय. तिरुपती बालाजी देवस्थानच्या लाडवाच्या प्रसादात वापरला जाणारा हा कापूर सध्या भलताच भाव खातोय.

सांगली : कोरोनामुळे आयुर्वेदाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. सध्या आयुर्वेदिक काढा पिण्याचा "ट्रेंड' असल्याने काही कंपन्यांनी काढ्याचा फॉर्म्युला तयार करून पॅकिंगमध्ये विकण्याची टूम काढली आहे. त्याचबरोबर भीमसेनी कापरालाही कधी नव्हे ते महत्त्व आलेय. तिरुपती बालाजी देवस्थानच्या लाडवाच्या प्रसादात वापरला जाणारा हा कापूर सध्या भलताच भाव खातोय. कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव करण्यासाठी त्याच्या धुरापासून जीवजंतूंचा प्रादुर्भाव होत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तसेच त्यापासून बनवलेला काढा कोरोनावर गुणकारी असल्याने त्याची मागणी वाढल्याने दोन महिन्यांत दर दीडपटीने वाढला आहे. 

टिकासारख्या दिसणाऱ्या या कापराला आयुर्वेदात विशेष औषधी महत्त्व आहे. त्याच्या सुगंधाने मानवी शरीराला फायदा होतो; शिवाय जीवाणू, विषाणू, लहान कीटक यांना नष्ट करण्यासाठी तो प्रभावी ठरतो. तो घरात जाळल्याने वातावरण शुद्ध व सात्त्विक राहते. कोरोना काळात तर घरोघरी त्याचा मोठा वापर केला जात असल्याने साहजिकच मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. 

कुठे व कसा तयार होतो? 
डेहराडून, सहारनपूर, कोलकाता, निलगिरी, म्हैसूर, हैदराबाद येथे सिनॅमोमम कॅम्फोरा या सदापर्णी वृक्षाचे खोड तसेच फांद्यांपासून वाफेच्या साहाय्याने कापूर काढला जातो. सुगंधी असल्याने त्याला निसर्गत: वेगळी चमक असते. पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या कापरात मेण असते; मात्र भीमसेनी कापूर कोणतेही रसायन न मिसळता तयार होत असल्याने तो ज्वालाग्राही असतो. त्यासाठी डबी किंवा प्लास्टिक पिशवीत तो पॅकबंद ठेवला जातो. 

आयुर्वेदिक महत्त्व अधिक अधोरेखित

सर्दी, खोकला, बद्धकोष्ठता, सांधेदुखी, मुखदुर्गंधी, खाज, दाह, इसब, किडलेल्या दातांसाठी भीमसेनी कापराचा पूर्वीपासून वापर केला जातो. कोरोना काळात तर याचे आयुर्वेदिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी याचा वापर वाढल्याने आधी 1400 रुपये किलो असणारा भीमसेनी कापूर आता 2000 ते 2200 रुपयांपर्यंत पोचला आहे. 
- श्रीनाथ दांडेकर, आयुर्वेदिक औषध विक्रेते, सांगली 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhimseni camphor rates So much growth; Effective during Corona period due to Ayurvedic importance