उड्डाणपुलांवर घोंगावतोय मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

उड्डाणपुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह
भुईंज व पाचवडमध्ये प्रवेश करताना वाहनधारकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच आत यावे लागते. त्यातच दोन्ही उड्डाणपुलांच्या स्लॅबमधील सिंमेटचे तुकडे खाली पडत असल्याने हे उड्डाणपूल सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उभा राहिला आहे. सातत्याने पडणाऱ्या भगदाडांमुळेही हे दोन्ही पूल नेहमीच चर्चेत असतात.

भुईंज - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग आता नव्याने आशियाई मार्ग म्हणून ओळखला जात असला तरी महामार्ग आशियाई आणि काम गल्लीतलं अशी तऱ्हा भुईंज, पाचवड येथील उड्डाणपुलांची झाली आहे. चौपदरीकरणातील चुकांचे अनुकरण करीत सहापदरीकरणाचे काम अर्धवट राहिल्याने तसेच सातत्याने पडणाऱ्या भगदाडांमुळे या ठिकाणी क्षणाक्षणाला मृत्यू डोक्‍यावर घोंगावत आहे.

भुईंज-पाचवड फाट्यावर दिवसातून किमान एक-दोन लहान-मोठे अपघात घडतात. आतापर्यंत झालेल्या अपघातांत अनेकांनी जीव गमावला आहे. हे संकट टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरण अथवा संबधित ठेकेदार कंपनीला गांभीर्य दिसत नाही. भुईंज-पाचवड गावचे प्रवेशव्दार असलेले हे उड्डाणपूल अस्ताव्यस्त वाहतुकीमुळे नेहमीच अपघाताला निमंत्रण देत असतात. त्यातच या उड्डाणपुलाखाली असणारे मातीचे सिंमेटचे मोठे ढीग व त्यातच उभी असलेली खासगी वाहने अपघाताला निमंत्रण देतात. महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून पाचवड व भुईंज येथील उड्डाणपुलांना भगदाड पडण्याची मालिकाच सुरू झाली आहे. सुरवातीला पडलेले 
भगदाड एक वर्षानंतर मुजविण्यात आले. वाहतूक सुरळीत झाली की दर दोन, तीन महिन्यांतून येथे भगदाड पडत असून त्यातील स्टीलही बाहेर आलेले दिसते. भगदाड पडण्याची मालिका सुरू असतानाच या उड्डाणपुलांच्या 
एकंदरीत बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे पुलाखालून जाताना आता प्रवांशाबरोबर स्थानिक नागरिकांनाही भीती वाटू लागली आहे. 

Web Title: bhuinj satara news over bridge dangerous