कर्नाटकातही लवकरच भूमाता ब्रिगेडच्या शाखा - तृप्ती देसाई

- राजेंद्र हजारे
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

निपाणी - निपाणीत विद्यार्थिनीवर शिक्षकानेच केलेला अत्याचार संतापजनक असून, मुलीच्या न्यायासाठी नागरिक सक्षमपणे उभे राहिल्याची बाब कौतुकास्पद आहे. अद्याप पीडित मुलीला शिक्षण घेण्याची इच्छा असून, तिला पाठबळाची गरज आहे. धास्तावलेल्या या कुटुंबाला सरकारने मदत करण्याची आवश्‍यकता आहे. कर्नाटकातील महिलांवरील अन्याय, अत्याचार कमी करण्यासाठी लवकरच भूमाता ब्रिगेडच्या शाखा कर्नाटकातही सुरू करणार असल्याचे भूमाता महिला ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांनी "सकाळ'ला सांगितले.

निपाणीत येऊन देसाई यांनी पीडित मुलीची भेट घेऊन तिला धीर दिला. त्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी करून विद्यार्थिनीला मदत करण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही सांगितले.

देसाई म्हणाल्या, 'महिलांनी आता केवळ चूल आणि मूल या परिघात न राहता बाहेरच्या जगात वावरले पाहिजे. निपाणीतील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरवासीयांनी दाखविलेले संघटन महत्त्वाचे आहे. अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी महिलांनी रस्त्यावर उतरून दुर्गेचा अवतार घेण्याची गरज आहे.''

'ताईगिरी' चित्रपट
महाराष्ट्रात भाईगिरी, दादागिरीनंतर आता महिलांनी "ताईगिरी' सुरू केली आहे. त्याची दखल घेऊन "ताईगिरी' हा मराठी चित्रपट आपल्या जीवनावर प्रदर्शित होणार आहे. महिलांच्या या ताईगिरीमुळे समाजातील महिलांवरील गुन्हे कमी होण्याची आशा आहे, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.

Web Title: bhumata brigade branches in karnataka