दिग्गज नेते शिवसेनेच्या वाटेवर; दोन्ही पक्षांची स्वबळाची तयारी

तात्या लांडगे
सोमवार, 29 जुलै 2019

उमेदवारी मिळण्याच्या अटीवर होणार पक्ष प्रवेश 

सोलापूर : लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या वातावरणाचा अंदाज घेऊन जिल्ह्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. तर स्टॅण्डींग आमदार सोडून आपल्याला उमेदवारी मिळणार नाही या हेतूने भाजपमधील काही नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल, बबनराव शिंदे, रमेश कदम कॉंग्रेसचे आमदार भारत भालके आणि कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, भाजपचे नेते नागनाथ क्षिरसागर यांचा समावेश आहे. 

कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कारभाराला वैतागलेल्या मतदारांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेनेला सत्ता दिली. मात्र, काही महिन्यांपासून भाजपने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आजी माजी आमदारांना पक्षात घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे युतीची बदनामी होईल या हेतूने शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्वबळाची तयारी ठेवा असे निर्देश मातोश्रीवरुन मिळाल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्याने सांगितले.

राज्यात सध्या शिवसेनेचे 63 आमदार असून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक संधी शिवसेनेकडूनच मिळेल या आशेने अनेकजण शिवसेनेत यायला इच्छूक आहेत. त्यानुसार मतदारसंघनिहाय इच्छूकांची चाचपणी केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपनेही शिवसेनेच्या मतदारसंघात तगडा उमेदवार शोधायला सुरवात केल्याचेही चित्र दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बुधवारी (ता. 31) सोलापूर दौऱ्यावर येणार असून मोहोळ, माढा व बार्शीचा दौरा करणार आहेत. 

शहर उत्तर व मध्य मधून इच्छूकांत वाढ 
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून जिल्हाप्रमुख महेश कोठे, गणेश वानकर यांच्याशिवाय सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, अस्मिता गायकवाड, विष्णू कारमपुरी यांची नावे चर्चेत आली आहेत. तर शहर उत्तर मतदारसंघातूनही कोठे, ठोंगे-पाटील यांची आणि दक्षिण सोलापुरातून जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांनीही विधानसभेची तयारी दर्शविली आहे. 

गाफील राहू नका : स्वबळाची तयारी ठेवा 
युती होवो अथवा न होवो, स्बळावर लढण्याची तयारी ठेवा, असे निर्देश मातोश्रीवरुन देण्यात आल्याची चर्चा आहे. राज्यात सध्या शिवसेनेचे 63 आमदार असून आगामी निवडणुकीत किमान 90 जागा निवडून येतील, असे नियोजनही मातोश्रीवरुन करण्यात आले आहे. मागील निवडणुकीत ऐनवेळी युती तुटली मात्र, आता युती होणारच नाही असे समजून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना कामाला लागावे, अशा सूचनाही पक्षश्रेष्ठींनी दिल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big leaders in Solapur district on way to ShivSena