महापूरामुळे गणेशमूर्तींचे 45 लाखांचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

कोल्हापूर व सांगलीलाही महापुरामुळे कुंभार समाजाचे आतोनात नुकसान झाले आहे. त्याचेही पंचनामे झाले आहेत. त्यामुळे कुंभार समाजाला नुकसानभरपाई देण्याचा धोरणात्मक निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

कऱ्हाड ः शहर व परिसराला सलग चार दिवस कोयना-कृष्णा नदीच्या पाण्याचा विळखा होता. त्यात बाजारपेठेला कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले. त्या महापुराच्या फटक्‍याने कुंभार समाजाचेही कंबरडे मोडल्यासारखी स्थिती आहे. किमान 50 कुंभाराच्या 450 मूर्ती महापुरात खराब झाल्या आहेत. त्याचा अहवाल शासनास दिला आहे. कुंभार समाजाने त्याची सुमारे 45 लाखांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. 

कोल्हापूर व सांगलीला गणेशमूर्तींची याहीपेक्षा वाईट स्थिती आहे. त्यामुळे त्याच्या नुकसानभरपाईबाबत तिन्ही जिल्ह्यांत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. त्याच्या हालचीलीही सुरू आहेत. शासनाने केलेल्या पंचनाम्यामध्ये एक ते 13, 14 फुटापर्यंतच्या 455 गणेशमूर्ती खराब झाल्या आहेत. लहान मूर्ती पाण्यात वाहून गेल्या आहेत. अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवावर त्याचा परिणाम होणार आहे, त्यामुळे निम्म्या गणेश मंडळांना मूर्तीच नाही. अनेक मूर्ती वाहून गेल्याने मूर्तीच्या दरातही वाढ झाली आहे. 

कुंभार समाजाची वर्षभराच्या उलाढीलातील मोठी, महत्त्वाची उलाढाल गणेशेत्सावात होते. कारागीर त्यासाठी वर्षभर गणेशमूर्ती तयार करण्यासाठी झटतात. यंदा मात्र त्यांच्या त्या कारागिरीला पुराच्या पाण्याने चांगलाच फटका दिला आहे. चार दिवस महापुराच्या पाण्याने शहराला वेढले होते. त्यात कुंभार समाजाचेही मोठे नुकसान झाले आहे. येथील बालाजी मंदिरासमोर कुंभार समाजाच्या कारागिरांसाठी 2013 पासून मूर्तीसाठी जागा दिली गेली. ती जागा मोठी असून, ती नदी काठालगतच आहे. गणेश आगमनादिवशी कुंभारवाड्यासह त्या परसिरात होणाऱ्या वाहतुकीचा ताण कमी होण्यासाठी ती निवडण्यात आली होती. याहीवर्षी त्या जागेत कारागिरांची 40 शेड तयार करण्यात आली होती. तेथे 50 हून अधिक कुंभारांचे कारागीर काम करत होते. एक फुटापासून तब्बल 13 ते 14 फुटांपर्यंतच्या मूर्ती तेथे होत्या. काहींनी घरगुती मूर्तीही तेथे ठेवून तयार केल्या होत्या. मात्र, पुराच्या पाण्यात काही मूर्ती वाहून गेल्या आहेत. त्याचा काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेत्सोवावरही परिणाम होणार आहे. शहर, परिसरातील निम्म्याहून अधिक गणेश मंडळांना मूर्तीच नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याचेही गांभीर्य वाढले आहे. कुंभार समाजाच्या मूर्तीच्या नुकसानीचे शासनाने पंचानामेही केले आहेत. त्यात 455 मूर्तींचे नुकसान झाले आहे. त्याचा 50 वर कारागिरांनी फटका बसला आहे. अनेक लहान मूर्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. एक ते तीन फुटांच्या मूर्ती वाहून गेल्या आहेत. तर तीनपासून 13 फुटांपर्यंतच्या मूर्तींचे पाण्यात भिजल्याने अतोनात नुकसान झाले आहे. त्या सगळ्याची सुमारे 45 लाखांची नुकसानभरपाई देण्याची मागणी कुंभार समाजाने केली आहे. त्यामुळे त्याबाबत धोरणात्मक निर्णय होण्याची गरज आहे. मोठ्या मूर्तीचे नुकसान झाले आहे. त्याचा आराखडा अंदाजे बांधण्याचे काम सुरू आहे. राज्यमंत्री रवींद्र वाईकर, खासदार उदयनराजे भोसले यांनी कुंभार समाजाला भेट देवून नुकसानभरपाई देण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, नुकसानभरपाईचे धोरण अद्यापही निश्‍चित नाही. कोल्हापूर व सांगलीलाही महापुरामुळे कुंभार समाजाचे आतोनात नुकसान झाले आहे. त्याचेही पंचनामे झाले आहेत. त्यामुळे कुंभार समाजाला नुकसानभरपाई देण्याचा धोरणात्मक निर्णय होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कऱ्हाडच्याही नुकसानभरपाईचा निर्णय सांगली व कोल्हापूरच्या निर्णयाबरोबरच होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी शासन धोरणात्मक हालचालही करत आहे. 

नव्या मूर्तीही अशक्‍यच... 

शहरातील महापुराचा फटका कारागिरांना बसला आहेच. नव्याने मूर्ती तयार करून देणेही शक्‍य नाही. त्यासाठी गरजेचे हवे असलेले उन्हही सध्या नाही. त्यामुळे नवी मूर्ती तयार करून ती सुकणे शक्‍य नाही. त्यामुळे बहुतांशी गणेश मंडळांना यंदा मूर्ती नसल्याचा फटका सोसावा लागणार आहे. शिल्लक मूर्ती अत्यंत खराब झाल्या आहेत. शेडमधील मूर्ती दहा हजारांपासून पुढे होत्या. त्या आर्थिक नुकसानीचा फटका कुंभार समाजाच्या कारागिरांना यापूर्वीच सोसावा लागला आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A big loss of Ganesh idols due to floods