सोलापुरात आढळले दगडी भुयार

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामांसाठी रस्ता खोदतेवेळी हरिभाई देवकरण प्रशालेसमोरील जागेत दगडी भुयार आढळून आले आहे. हे भुयार ब्रिटिश कालावधीतील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

सोलापूर: स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामांसाठी रस्ता खोदतेवेळी हरिभाई देवकरण प्रशालेसमोरील जागेत दगडी भुयार आढळून आले आहे. हे भुयार ब्रिटिश कालावधीतील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सध्या रंगभवन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत विविध विकासकामे केली जाणार आहेत. हरिभाई देवकरण प्रशालेसमोर भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात येत असून, त्या वेळी हे भुयार आढळून आले आहे. हे भुयारच आहे की ब्रिटिशकालीन गटार याबाबत विविध तर्क लढविले जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीला लागून असलेल्या स्वच्छतागृहाला लागून हे भुयार आढळले आहे. त्याची सुरवात याच ठिकाणाहून झाली असून, ते गावडे मंगल कार्यालयाच्या दिशेने गेले आहे. 

या भुयाराची लांबी किती आहे याचा अंदाज अद्याप आलेला नाही. तथापि, या भुयारातून चालत जाता येते इतकी जागा आहे. मात्र, या भुयारातून चालत जाणे धोकादायक असल्याने भुयार कुठपर्यंत गेले आहे हे शोधण्याचा प्रयत्न अद्याप झालेला नाही. त्याचा शोध घेतल्यानंतर आणि पुरातत्त्व अभ्यासकांच्या पाहणीनंतरच हे भुयार आहे की गटार हे स्पष्ट होणार आहे. काही वर्षांपूर्वी लकी चौकात असेच भुयार आढळले होते, त्यावेळी ते गटार की भुयार यावरून बरेच वादंग झाले होते.

Web Title: big stone hole fonud in solapur