काँग्रेस-शिवसेना युतीचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

बिजवडी - पाचवड (ता. माण) ग्रामपंचायत निवडणुकीत मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणेच याहीवेळी काँग्रेसने शिवसेनेशी युती केली असून, राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे पोपट जगताप, तर शिवसेनेच्या उषा जगदाळे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

बिजवडी - पाचवड (ता. माण) ग्रामपंचायत निवडणुकीत मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणेच याहीवेळी काँग्रेसने शिवसेनेशी युती केली असून, राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे पोपट जगताप, तर शिवसेनेच्या उषा जगदाळे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

पाचवड येथे काँग्रेसचे वर्चस्व असून, त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसची गावात ताकद आहे, तर शिवसेनेनेही गावात आपले वजन निर्माण केले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीपासून शिवसेनेने काँग्रेसचा हात हातात घेत त्यांच्याशी युती केली असून, याहीवेळी तीच युती कायम ठेवण्यात आली आहे. या निवडणुकीत सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला असून, सत्ताधारी काँग्रेसला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी विविध प्रयत्न करत त्यांना सरपंचपद देण्याचेही आश्वासन दिले होते. मात्र, शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’ने ‘राष्ट्रवादी’च्या घड्याळ्याचे काटे बंद करत काँग्रेसच्या हातात हात घातल्याचे दिसून येत आहे.

या निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर काँग्रेसने शिवसेनेला तीन जागा दिल्या असून, सहा जागा काँग्रेसने स्वतःकडे ठेवल्याचे समजते. पाचवडमध्ये काँग्रेसचे नेतृत्व नवनाथ शिंगाडे, संजय जगदाळे करत असून, राष्ट्रवादीचे नेतृत्व चंद्रकांत जगदाळे, महादेव शिंगाडे, तर शिवसेनेचे नेतृत्व जोतिराम पवार, युवराज जगदाळे करत आहेत. काँग्रेस-शिवसेनेच्या युतीसमोर ‘राष्ट्रवादी’चा निभाव लागणे अवघड असले तरी सरपंचपदासाठी काँग्रेसकडून शकुंतला जगदाळे, तर राष्ट्रवादीकडून नंदा जगदाळे या दोघींच्यात सरळ लढत होण्याची शक्‍यता असून, या पदासाठी जनतेतून मतदान असल्याने दोन्ही उमेदवारांच्यात कोण जिंकून येणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

जावयांमुळे शिवसेनेची एक जागा बिनविरोध
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावचे जावई असलेले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी चांगलेच लक्ष घातल्याचे दिसून येत असून, त्यांच्या प्रयत्नामुळेच शिवसेनेची एक जागा बिनविरोध झाली आहे.

दिडवाघवाडी ग्रामपंचायत बिनविरोध
मलवडी - माण तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकीय सत्तासंघर्ष शिगेला पोचले असले तरी त्यातही दिलासादायक चित्र समोर  येत असून, दिडवाघवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जेवढ्या जागा तेवढेच उमेदवारी अर्ज शिल्लक असल्यामुळे ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याची केवळ घोषणाच बाकी आहे.

पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाने संधी नाकारल्यामुळे नाराज झालेले राष्ट्रवादी युवकचे माण तालुकाध्यक्ष बाळकृष्ण ऊर्फ बाळासाहेब काळे यांना दिडवाघवाडीच्या सरपंचपदाची संधी मिळाली आहे. दिडवाघवाडीचे विद्यमान सरपंच नारायण दिडवाघ, माजी सरपंच धनाजी दिडवाघ, पोपट दिडवाघ, सदाशिव गोरड, संजय दिडवाघ, दत्तु सरगर, आप्पा दिडवाघ, धनाजी कोकरे यांच्यासह मान्यवरांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सरपंचपदासाठी श्री. काळे यांची तर उपसरपंचपदासाठी अमोल रासकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी तात्यासाहेब दिडवाघ, अजिनाथ सरगर, बाळाबाई दिडवाघ, रुक्‍मिणी दिडवाघ, हौसाबाई सरगर व मालन सरगर यांची निवड करण्यात आली. जेवढ्या जागा तेवढेच उमेदवारी अर्ज भरले तसेच छाननीत हे सर्व अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे दिडवाघवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याची केवळ औपचारिक घोषणाच बाकी राहिली आहे. निवडीबद्दल बाळासाहेब दिडवाघ यांचे रामराजे नाईक-निंबाळकर, शशिकांत शिंदे, मनोज पोळ, शेखर गोरे, डॉ. संदीप पोळ, बाळासाहेब सावंत यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले.

Web Title: bijwadi satara news grampanchyat election