विचित्र अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

मलकापूर -पाच वाहनांच्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार ठार झाला, तर दोन्ही ट्रक चालकांसह तिघे गंभीर जखमी झालेत. पुणे- बंगळूर महामार्गावर येथील खरेदी- विक्री पंपासमोर काल (ता. 30) रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. सचिन मारुती मोरे (वय 34, रा. तुळजाईनगर, मलकापूर, ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. 

मलकापूर -पाच वाहनांच्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार ठार झाला, तर दोन्ही ट्रक चालकांसह तिघे गंभीर जखमी झालेत. पुणे- बंगळूर महामार्गावर येथील खरेदी- विक्री पंपासमोर काल (ता. 30) रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. सचिन मारुती मोरे (वय 34, रा. तुळजाईनगर, मलकापूर, ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. 

रावसाहेब मधुकर पवार (वय 36), सुखदेव भरत पाटील (वय 27, दोघेही रा. अमळनेर, जि. नगर), शशिकांत बाबूराव भोसले (वय 48) सुनील शंकर जाधव (वय 49, रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः शशिकांत भोसले हे ट्रक (एमएच 50 - 1900) घेऊन उंब्रजहून कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. येथील पादचारी पुलाजवळ हा ट्रक आला. त्या वेळी क्रेन घेऊन कोल्हापूरच्या दिशेने निघालेला दुसऱ्या ट्रकने (एमएच 18 एए 7083) पाठीमागून समोरच्या ट्रकला जोरात धडक दिली. धडक बसल्यानंतर पहिल्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने त्याच वेगात ट्रक उपमार्गावर घुसला. त्याच वेळी कोल्हापूर नाक्‍यावर निघालेल्या सचिन मोरे यांची दुचाकी ट्रकसमोर आल्यावर दुचाकीला वाचवण्यासाठी चालकाने ट्रक नाल्यावरून महामार्गावर ओढला, तरीही दुचाकीसह मोरे ट्रकखाली सापडले. 

क्रेन घेऊन निघालेल्या ट्रक चालकाचाही ताबा सुटल्याने महामार्गाच्या दुभाजकाची लोखंडी जाळी तोडत पलीकडे कोल्हापूर- सातारा लेनवर गेला. त्याचवेळी कोल्हापूरहून सातारा दिशेने जात असलेल्या तिसऱ्या ट्रकशी (एमएच 12 एचडी 975) समोरासमोर धडक झाली. पाठीमागून मुंबईकडे निघालेल्या खासगी लक्‍झरी बसचीही (एमएच 09 बीसी 7308) ट्रकशी धडक बसली. या पाच वाहनांच्या विचित्र अपघातांत तिन्ही ट्रक चालकांसह दुचास्वार व क्‍लीनर असे पाच जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभाग, महामार्ग पोलिस व कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. दुचाकीसह ट्रकखाली अडकलेल्या सचिन मोरे व चेपलेल्या पत्र्यात अडकलेल्या ट्रक चालकांसह सर्व जखमींना काढून उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सचिन मोरे यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, या अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही लेनवरील वाहतूक सुमारे तीन तास बंद होती. महाहामार्गावरून जाणाऱ्या व येणाऱ्या दोन्ही लेनवरील वाहतूक दोन्ही बाजूच्या उपमार्गावर वळवण्यात आली होती. 

ते परत आलेच नाहीत... 

अपघातात ठार झालेले सचिन मोरे हे शीतपेयांच्या बाटल्या सप्लाय करत होते. काल दिवसभर व्यवसाय अटोपून रात्री नऊ वाजता घरी आले. झोपण्यापूर्वी मुख्य वितरकाचा त्यांना फोन आला. कोल्हापूर नाक्‍यावर एकाला दोन हजार रुपये द्या, असे त्यांनी सांगितले. दुचाकीवरून ते हे पैसे देण्यासाठी गेले. घरापासून काही अंतरावरच त्यांचा अपघात झाला. ते घरी परत आलेच नाहीत.

Web Title: Bike rider died in the accident