दुचाकी चोरणारी अंतरराज्य टोळी पोलिसांच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 January 2020

सोलापूर, मंगळवेढा, जत, उमदी, सांगली, मिरज, विजापूर विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकीची चोरी करणारी टोळी मंगळवेढा पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे.

सोन्याळ, ता. 30 : सोलापूर, मंगळवेढा, जत, उमदी, सांगली, मिरज, विजापूर विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकीची चोरी करणारी टोळी मंगळवेढा पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे.

संभाजी हणमंत नलवडे (वय 26), प्रसन्ना ऊर्फ गोट्या प्रकाश कळळी (वय 22) (दोघे रा. संख, ता. जत, जि. सांगली) व कुमार तानाजी पाटील (रा. बोराळे, ता. मंगळवेढा) या तिघांना मंगळवेढा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 20 दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. सोलापूर, सांगतली जिल्ह्यासह कर्नाटकातूनही गाड्या चोरून आणल्या आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मंगळवेढा पोलिसांना दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. दोन इसम मरवडे येथील हॉटेल महाराजा समोर चोरीची बिगर नंबरची दुचाकी घेऊन मंगळवारी (ता. 28) विक्रीकरता येणार असल्याची खात्रीशीर बातमी त्यांना मिळाली. मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलिस पथक खासगी वाहनाने मरवडे येथे पोहोचले. बातमीप्रमाणे हॉटेल महाराजा येथे थोड्या थोड्या अंतरावर थांबले. 

दुपारी 2.15 च्या सुमारास हुलजंतीकडून येणारे रोडने दोन इसम लाल रंगाच्या दुचाकीवरून हॉटेल महाराजासमोर येऊन थांबले. त्यावेळी त्यांना पोलिसांनी पकडले. त्यांना नाव पत्ता विचारले असता मोटारसायकल चालवणाऱ्या इसमाने आपले नाव संभाजी हणमंत नलवडे व पाठीमागे बसलेल्या इसमाने आपले नाव प्रसन्ना ऊर्फ गोट्या प्रकाश कळळी असे सांगितले. दुचाकीची कागदपत्रे व वाहन परवान्याबाबत विचारपूस करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. कावरेबावरे झाल्याने पोलिसांचा संशय पक्‍का झाला.

अधिक तपासात त्यांनी ही दुचाकी 5-6 महिन्यांपूर्वी मंगळवेढा शहरातील हॉटेल शिवनेरी समोरून डुप्लीकेट चावीचा वापर करून चोरलेली असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन ठाण्यात हजर केले. अधिक चौकशीत त्यांनी महाराष्ट्रातील सांगली, मिरज, सोलापूर, मंगळवेढा येथून, तसेच कर्नाटकातील विजापूर, अथणी, इरकल, चडचण येथून गाड्या चोरून आणल्या असल्याचे.

त्यांची बोराळे परिसरात विक्री करण्यासाठी त्यांचा नातेवाईक कुमार तानाजी पाटील याच्या ताब्यात दिल्या असल्याची कबुली दिली. त्यानंतर कुमारलाही अटक केली व त्याच्याकडून 9 मोटारसायकली हस्तगत केल्या. तसेचे संभाजीने दिलेल्या माहितीनुसार संख येथील त्याच्या घरातून व शेतातून 10 दुचाकी जप्त केल्या आहेत.

त्यांनी आणखी 2 मोटारसायकली आणि एक ट्रेलर चोरल्याची कबुलीही दिली आहे. या गुन्ह्यांत त्यांचे आणखी साथीदार असण्याची शक्‍यता असून, अधिक तपास सहाय्यक फौजदार संजय राऊत करीत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bike stealing gang arrested by police