जैवविविधता होतेय नष्ट... आता नंबर माणसाचाच!

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

दूषित, क्षारयुक्त पाण्यामुळे जैवविविधता नष्ट होत आहे. जनावरांच्या भाकड कालावधीमध्ये वाढ झाली आहे. पूर्वी उजनीच्या पाण्यात मासेमारीचा व्यवसाय जोरात चालायचा, पण आता प्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. सध्या फक्त चिलापी नावाचे मासे उजनीच्या पाण्यात सापडतात. प्रदूषित पाण्यामुळे अनेकजण मुतखड्याच्या आजाराने त्रस्त आहेत. जलप्रदूषणावर वेळीच नियंत्रण आले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल.
- बाळासाहेब बोडखे,
पर्यावरण शिक्षक 

सोलापूर : पूर्वी उजनीच्या पाण्यात माशांच्या अनेक प्रजाती सापडायच्या. पाणी जसजसे प्रदूषित होत गेले तसतशा माशांच्या प्रजाती पाण्यातून नाहीशा झाल्या. आता फक्त चिलापी नावाचा मासा पाण्यात सापडतोय. जलप्रदूषणामुळे जैवविविधता नष्ट होत आहे. आता नंबर माणसाचाच आहे, असे ठाम मत पर्यावरण शिक्षक बाळासाहेब बोडखे यांनी नोंदवले.

मूळचे नगरचे असणाऱ्या व सध्या कोंढार चिंचोली (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या श्री. बोडखे यांना पुण्यात "अनसंघ हिरो' पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. जीवित नदी संस्थेच्या वतीने नदी संवर्धनाबाबत जाणीव-जागृतीचे उपक्रम राबविल्याबद्दल जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यानिमित्ताने "सकाळ'ने श्री. बोडखे यांच्याशी संवाद साधला. उजनी धरणातील पाण्याचा नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून ते प्रबोधन करीत आहेत. दूषित किंवा क्षारयुक्त पाणी पिण्यामुळे जनावरांच्या भाकड कालावधीमध्ये वाढ होत असल्याची माहिती त्यांनी समोर आणली आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत पर्यावरण सेवा योजनेच्या माध्यमातून त्यांनी काम केले आहे. या योजनेअंतर्गत पुणे येथे प्रशिक्षण घेऊन त्यांनी आपल्या कामाला सुरवात केली. पाणी, ऊर्जा, घनकचरा, जैवविविधता अशा विषयांचा या योजनेमध्ये समावेश आहे.

श्री. बोडखे म्हणाले, "कोंढार चिंचोली हे उजनीच्या धरणक्षेत्रात वसलेले पुनर्वसित गाव आहे. पूर्वी गावात पाण्याची वणवण होती; परंतु उजनी धरण झाले आणि गावाचा कायापालट झाला. मात्र पाण्यातील प्रदूषण वाढत असल्याने त्याचा एकूण जनजीवनावर परिणाम होत आहे. जलप्रदूषणामुळे होणारे परिणाम सांगून नदी संवर्धनासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पर्यावरण सेवा योजनेचे विभाग समन्वयक गणेश सातव, मुख्याध्यापक दत्तात्रय खाटमोडे, सहशिक्षक तुकाराम माळकर, अनिता बारवकर, विठ्ठल इवरे यांच्यासोबत विद्यार्थ्यांचे यासाठी विशेष सहकार्य मिळत आहे.'

दूषित, क्षारयुक्त पाण्यामुळे जैवविविधता नष्ट होत आहे. जनावरांच्या भाकड कालावधीमध्ये वाढ झाली आहे. पूर्वी उजनीच्या पाण्यात मासेमारीचा व्यवसाय जोरात चालायचा, पण आता प्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. सध्या फक्त चिलापी नावाचे मासे उजनीच्या पाण्यात सापडतात. प्रदूषित पाण्यामुळे अनेकजण मुतखड्याच्या आजाराने त्रस्त आहेत. जलप्रदूषणावर वेळीच नियंत्रण आले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल.
- बाळासाहेब बोडखे,
पर्यावरण शिक्षक 

Web Title: biodiversity is extinguishing