पक्षी संवर्धन मोहिमेला २० मार्चला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

चला पक्षी वाचवायला..! - महापालिका, वन विभाग, ‘सकाळ’चा संयुक्त उपक्रम

चला पक्षी वाचवायला..! - महापालिका, वन विभाग, ‘सकाळ’चा संयुक्त उपक्रम

सांगली - शहरातील विविध उद्यानांत झाडांवर प्रजनन होणाऱ्या पक्ष्यांपैकी अनेक जखमी पक्ष्यांचे प्राणिमित्रांकडून संगोपन करून पुन्हा निसर्गात सोडले जाते. दरवर्षी पाचशेंवर पक्ष्यांना जीवदान दिले जाते. यंदा ही मोहीम अधिक व्यापक करून पक्षी संवर्धन व त्याबाबतची जनजागृती करण्यात येणार आहे. शहरातील विविध पक्षी-प्राणिप्रेमी संघटना, महापालिका, वन विभाग आणि सकाळ माध्यम समूहाच्या वतीने या मोहिमेसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्याचा प्रारंभ २० मार्च रोजी शास्त्री उद्यानात करण्यात येणार आहे. त्यासाठी ठिकठिकाणी जनजागृती केली जात आहे. 

दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारीपासून पक्षी प्रजननासाठी शहरातील विविध उद्यानात आश्रय घेतात. मार्च, एप्रिलपासून वेण सुरू होते. त्यावेळी पक्ष्यांची पिलं खेळताखेळता घरट्यातून जमिनीवर आदळतात आणि जखमी होतात. त्यांना तातडीने उपचार मिळाळे, तर जीवदान देणे शक्‍य आहे. त्यासाठी पक्षिमित्रांची टीम सक्रिय असते. यंदा ही मोहीम व्यापक करण्यात येणार आहे. मोहिमेचा पुढील सहा महिन्यांचा कृती कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, खोपा तयार करण्यासाठी कार्यशाळा, घरोघरी पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सोय, असा कार्यक्रम असेल. जागतिक चिमणी दिनाचा योग साधून येत्या २० मार्चला शास्त्री उद्यानात मोहिमेला प्रारंभ केला जाईल. त्यात शहरातील नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.

मोहिमेच्या नियोजनाची प्राथमिक बैठक आज घेण्यात आली. नगरसेवक शेखर माने अध्यक्षस्थानी होते. वनविभागाची परवानगी, मोहिमेचे नियोजन, प्रबोधनात्मक फलक याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सोमवारी महापालिकेतर्फे शास्त्री उद्यानाची पाहणी करण्यात येणार आहे. त्याठिकाणी लागणाऱ्या सुविधांची तातडीने पूर्तताही करण्यात येईल, असे श्री. माने यांनी सांगितले. यावेळी नगरेसवक बाळासाहेब गोंधळी, हेमंत खंडागळे, डॉल्फिन नेचर रिचर्स ग्रुपचे अध्यक्ष प्रा. शशिकांत ऐनापुरे, ॲनिमल सहारा फाऊंडेशनचे अजित काशीद, गोविंद सरदेसाई, इम्तीयाज शेख उपस्थित होते. 

मोहिमेत सहभागी संस्था
मोहिमेसाठी आयुक्त रवींद्र खेबुडकर, नगरसेवक शेखर माने, पोलिस उपाक्षीक्षक डॉ. दीपाली काळे, विभागीय वनाधिकारी समाधान चव्हाण सक्रिय सहभागी आहेत. तसेच ‘सकाळ माध्यम समूह’, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका, रॉयल्स्‌ यूथ स्टुटंड फाउंडेशन, ॲनिमल राहत, ॲनिमल सहारा फाऊंडेशन, डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप, खोपा बर्ड हाऊस, बर्ड साँग्स्‌, इन्साफ फाऊंडेशन आदी संस्थाही सहभागी आहेत. 

नागरिकहो.. आपण हे करा 
जखमी पक्ष्यांबाबत तातडीने पक्षिमित्रांना कळवा 
परिसरात पक्ष्यांसाठी खाद्य व पाण्याची सोय करा. 
पक्ष्यांसाठी बंगला, फ्लॅटमध्ये कृत्रिम खोपे तयार करून लावा. 
चिमणी गणना उपक्रमात सहभागी व्हा. 
आपल्या सहभागाचे स्वरूप या क्रमांकावर व्हॉटस्‌ॲप (९१४६०९५५००) कळवा. 

Web Title: Bird conservation project started on March 20