कीटकनाशकांमुळे स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण होतेय कमी!

bird
bird

सोलापूर : पृथ्वीच्या कलण्याने ऋतू बदलतात आणि उत्तरेकडील गोठवणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक प्रकारचे पक्षी हजारो किलोमीटर्सचा प्रवास करून आपल्याकडे म्हणजे उष्ण कटिबंधीय प्रदेशात येतात. जगभरात सर्वत्र पिकांवर कीटकनाशके फवारण्यात येत असल्याने पक्ष्यांच्या स्थलांतरणावर परिणाम होत आहे. सोलापूर परिसरात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण कमी होत असल्याचे निरीक्षण पक्षी अभ्यासकांनी नोंदविले. 

2006 पासून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जागतिक स्थलांतरित पक्षीदिन साजरा केला जातो. स्थलांतरित पक्ष्यांना अधिवास आणि संरक्षण पुरवणे या मूळ संकल्पनांचा प्रसार आणि जाणीव होण्यासाठी हा दिवस साजरा केला जात आहे. भारतीय उपखंडात दोन मार्गांनी पक्षी स्थलांतर करून येतात. त्यातील सर्वात महत्त्वाचा मार्ग हा इंडस व्हॅली मार्ग म्हणून ओळखला जातो. हा आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेला, पाणथळीच्या पक्ष्यांचा चौथ्या क्रमांकाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. भारतात येणारे बहुतेक पक्षी या मार्गाने येतात. पक्ष्यांचा दुसरा हवाई मार्ग हा इशान्येकडून ब्रह्मपुत्रा नदीच्या मार्गाने भारतीय उपखंडात येतो. स्थलांतरित पक्ष्यांचे आपल्याकडे वास्तव्य साधारण सप्टेंबर ते मार्च, फार फार तर एप्रिलपर्यंत असते. त्यानंतर येथील वातावरणातील उष्णता वाढल्याने ते येथून परत थंड हवेच्या दिशेने निघून जातात. भारतात आढळणारे स्थलांतरित पक्षी मुख्यत: मध्य आशिया, युरोप, कझाकिस्तान, सैबेरिया येथून येतात. वेगवेगळ्या कारणांमुळे स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण कमी होत असल्याचे पक्षी अभ्यासकांनी सांगितले. 

सोलापूर परिसरात सिद्धेश्‍वर तलाव, होटगी तलाव, हिप्परगा तलाव, संभाजी तलाव आहेत. रामपूर, आष्टी, चांदणी तलाव (सांगोला), यमाई तलाव (पंढरपूर), माळशिरस, बोरामणी, इटकळ, बाभूळगाव आणि उजनी जलाशय ही सोलापूर परिसरातील महत्त्वाची पाणथळी आहेत. सोलापूर शहराजवळच्या हिप्परगा व एकरूख गावादरम्यान मोठे क्षेत्र व्यापले आहे. येथे पक्ष्यांची मांदियाळी असते. एवढ्या वर्षांनंतरही येथे पक्ष्यांची विविधता कायम आहे. पक्ष्यांची संख्या लाखावरून हजारांवर आली आहे. स्थानिक पक्ष्यांसोबतच ऑक्‍टोबरपासून मार्च-एप्रिलपर्यंत अनेक परदेशी स्थलांतरित पक्षी येथे येतात. या परिसरात 220 प्रजातींचे पक्षी नोंदविले गेले आहेत. यापैकी 124 हे स्थलांतरित, 96 वर्षभर इथेच आढळणारे पक्षी आहेत. 

जगभरात सगळीकडेच पिकांवर कीटकनाशके मारली जात आहेत, त्यामुळे अनेक पक्षी मरतात. त्यांची उपासमार होते. एक हजार पक्षी स्थलांतरित झाले तर परत फक्त 200 येत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. स्थलांतर करून आलेल्या पक्ष्यांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. सोलापूर जवळील हिप्परगा तलाव परिसरातही शेतीवर कीटकनाशके वापरली जातात. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण कमी होत आहे, यावर जनजागृती आवश्‍यक आहे. 
- डॉ. निनाद शहा, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com