पक्षी आश्रयस्थानात चंदनतस्करी

अंकुश चव्हाण
बुधवार, 19 डिसेंबर 2018

कलेढोण - राज्यात पक्षी आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायणी पक्षी आश्रयस्थानात चंदनतस्करी होत असून, त्यासाठी छोट्या-मोठ्या झाडांवरही चंदनतस्कर कुऱ्हाडी चालवत आहेत. तर दुसरीकडे ३६५ हेक्‍टर क्षेत्रात पसरलेल्या वनक्षेत्राचे कुंपणही रामभरोसे असल्यामुळे वन विभागाचे झाडांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.

कलेढोण - राज्यात पक्षी आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायणी पक्षी आश्रयस्थानात चंदनतस्करी होत असून, त्यासाठी छोट्या-मोठ्या झाडांवरही चंदनतस्कर कुऱ्हाडी चालवत आहेत. तर दुसरीकडे ३६५ हेक्‍टर क्षेत्रात पसरलेल्या वनक्षेत्राचे कुंपणही रामभरोसे असल्यामुळे वन विभागाचे झाडांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यासह राज्यात मायणीच्या पक्षी आश्रयस्थानाचे नाव अग्रेसर आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मायणीच्या ब्रिटिशकालीन तलावात पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे तलावातील पाण्यावर अवलंबून असणारा मल्हारपेठ-पंढरपूर रस्त्याच्या उजव्या बाजूवर असणारा बगीचा सुकून गेल्याने वनखात्यानेही दुर्लक्ष केले. त्यामुळे हा बगीचा केवळ ‘शोपीस’ बनून राहिला आहे. येथील विविध प्रकारच्या झाडांना वाळवी लागली आहे. त्यात काचा, बाटल्याचा खच पडून असतो. याच आश्रयस्थानास वन विभागाने झाडांच्या कत्तली रोखण्यासाठी तारेचे कुंपण घातले आहे.

मात्र, या कुंपणाला आधार देणारे सिमेंटचे कित्येक पोल निघून पडले आहेत. तर पोल आधार नसल्याने तारा जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यातून महागड्या असणाऱ्या चंदनाच्या झाडांची तस्करी होत आहे.

आश्रयस्थानातील तलावाशेजारच्या किनाऱ्यावर चंदनाची छोटी झाडे आहेत. मात्र, अशा छोट्याही झाडांची कत्तल करण्यास चंदनचोर मागे-पुढे पाहात नाहीत. 

येथे असणाऱ्या वन विभागातील अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांच्या मदतीने नव्या जागेत असणारा बगीचा, त्यात रोपांची लागण करणे, खतपाणी घालणे याकडे लक्ष देत असल्यामुळे जुन्या बगीच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. सुमारे ३६५ हेक्‍टर क्षेत्रातील कित्येक झाडे वाळून गेली आहेत. त्यातील काहींना वाळवी लागली आहे. तर वाळलेल्या झाडांवर छुप्या मार्गाने कुऱ्हाडी पडत आहे. त्याकडे वन खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा ग्रामस्थ आरोप करीत आहेत. आश्रयस्थानात होणाऱ्या झाडांच्या कत्तलीकडे वन खात्याने लक्ष देण्याची गरज आहे.

कापा अन्‌ सोडून द्या...
चंदनासाठी मोठा बुंधा असलेली झाडे तस्कर शोधतात. त्यात सुवासिक गर नसेल तर ते झाड सोडून देतात. अशाच पद्धतीने या झाडांची कत्तल होत आहे. त्यामुळे कापा अन्‌ सोडून द्या, असे चित्र आश्रयस्थानात पाहावयास मिळत आहे.

Web Title: Bird Sand Smuggling Crime