पक्षी संवर्धन मोहिमेत ‘आयएमए’चा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

२० मार्चला प्रारंभ - ‘सकाळ’, महापालिका, वन विभाग, पक्षिमित्र संघटनांचा संयुक्त उपक्रम 

सांगली - कृष्णाकाठ लाभलेल्या या सांगली शहरात शंभरावर पक्ष्यांच्या जातींचे वास्तव्य आहे. शहर आरोग्यदायी असल्याची ही एक पावतीच आहे.

२० मार्चला प्रारंभ - ‘सकाळ’, महापालिका, वन विभाग, पक्षिमित्र संघटनांचा संयुक्त उपक्रम 

सांगली - कृष्णाकाठ लाभलेल्या या सांगली शहरात शंभरावर पक्ष्यांच्या जातींचे वास्तव्य आहे. शहर आरोग्यदायी असल्याची ही एक पावतीच आहे.

पण वाढत्या विस्तारात पक्ष्यांचे जीवन विस्कळित झाले आहे. त्यांच्या संवर्धनासाठी आता शहरातील विविध पक्षी-प्राणिप्रेमी संघटना, महापालिका, वन विभाग आणि सकाळ माध्यम समूहाच्या वतीने व्यापक मोहिमेसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यात इंडियन मेडिकल असोसिएशनचाही उत्स्फूर्त सहभाग राहणार आहे. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल मडके यांनी पक्षी वाचवा मोहिमेत सर्व डॉक्‍टर सहभागी होतील, असे आश्‍वासनही दिले आहे. येत्या २० मार्चला शास्त्री उद्यानात मोहिमेचा प्रारंभ होईल.

शहरातील विविध उद्यानांत झाडांवर प्रजनन होणाऱ्या पक्ष्यांपैकी अनेक जखमी पक्ष्यांचे प्राणिमित्रांकडून संगोपन केले जाते. दरवर्षी पाचशेवर पक्ष्यांना जीवदान दिले जाते. यंदा अधिक पक्ष्यांना जीवदान देण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या महिन्याभरापासून जनजागृती सुरू आहे. महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या पुढाकारानेच ‘आयएमए’ संस्था सहभागी झाली आहे. 

पक्षिमित्रांच्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी नगरसेवक शेखर माने यांच्या नेतृत्वाखाली येथील शास्त्री उद्यानाची पाहणी करण्यात आली. या वेळी उपमहापौर विजय घाडगे, महापालिकेचे उद्यान पर्यवेक्षक एस. ए. कोरे, ॲनिमल सहाराचे अजित काशीद, सचिन शिंगारे, इन्साफचे मुस्तफा मुजावर, शरद पोंक्षे उपस्थित होते. शास्त्री उद्यानात जखमी पक्ष्यांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना श्री. कोरे यांना देण्यात आल्या. आयुक्त खेबुडकर यांनी याबाबतचा आढावाही घेतला.

त्याचबरोबर पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपायुक्त स्मृती पाटील, विभागीय वनाधिकारी समाधान चव्हाण यांचाही सक्रिय सहभाग राहणार आहे. रॉयल्स यूथ स्टुडंट फाउंडेशन, ॲनिमल राहत, ॲनिमल सहारा फाउंडेशन, डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप, खोपा बर्ड हाउस, बर्ड साँग्स्‌, इन्साफ फाउंडेशन संस्थाही सहभागी आहेत. 

मोहिमेत महापालिकेचा सक्रिय सहभाग आहे. पक्षिजीवन समृद्ध करण्यासाठी उद्यानात कृत्रिम खोपे लावण्यासाठी ‘आयएमए’ने पुढाकार घेतला आहे. तसेच येणाऱ्या वर्षभरात पक्ष्यांच्या घरट्यासाठी ठिकठिकाणी झाडे लावण्याची मोहीम घेतली जाईल. पक्षिमित्रांना महापालिकेचे पूर्ण सहकार्य राहील.’’
- रवींद्र खेबुडकर, आयुक्त

पक्षी संवर्धन ही काळाची गरज बनली आहे; परंतु आजच्या आधुनिक युगात आणि कीटकनाशकांमुळे अन्नसाखळी मोडकळीस आली आहे. त्यामुळे चिमण्यांची संख्या कमी झाली आहे. शहराचे वैभव टिकवण्यासाठी ‘आयएमए’चे पूर्ण सहकार्य राहिले. शहरातील नागरिकांनीही यात सहभागी व्हावे.’’
- डॉ. अनिल मडके, अध्यक्ष, आयएमए, सांगली.

पुनर्वसन केंद्रासाठी लागणाऱ्या पिंजऱ्यांची व्यवस्था वन विभागाकडून केली जाईल. यंदा सर्वाधिक प्रमाणावर पक्षी वाचवण्यासाठी वन विभागाचे सहकार्य राहिले.
- समाधान चव्हाण, वनाधिकारी.

पुनर्वसन केंद्रासाठी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी आमचा पाठपुरावा राहील. तसेच शहरात विविध पक्ष्यांच्या जातींचे वास्तव्य आहे. त्यांची जपणूक करण्यासाठी उपमहापौर गटाचे सर्व सदस्य यात सक्रिय सहभागी होतील.
- शेखर माने, नगरसेवक

Web Title: bird security campaign