व्वा... सोलापुरात दिसला नारंगी डोक्‍याचा कस्तुर! 

परशुराम कोकणे
बुधवार, 22 मे 2019

नारंगी डोक्‍याचा कस्तुर हा पक्षी संकटग्रस्त आहे. आयुसीएन संस्थेच्या रेड लिस्टमध्ये या पक्ष्याचे नाव आहे. या पक्ष्याची संख्या गेल्या 10 वर्षांत 30 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. हा पक्षी 1956 मध्ये पहिल्यांदा हॉंगकॉंगमध्ये दिसून आला होता. हा पक्षी भारतासह बांगलादेश, श्रीलंका तसेच आशिया खंडात काही भागात आढळतो. या पक्ष्याचे संवर्धन करणे आवश्‍यक आहे. 
- रत्नाकर हिरेमठ, पक्षीप्रेमी

सोलापूर : दुर्मिळ प्रजातीचा नारंगी डोक्‍याचा कस्तुर पक्षी सोलापुरात दुसऱ्यांदा दिसला आहे. नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी गेल्या आठवड्यात या पक्ष्याच्या हालचाली टिपल्या आहेत. 

2012 मध्ये अभिषेक देशपांडे यांना हा पक्षी सिद्धेश्‍वर वनविहार परिसरात आढळला होता. गेल्या आठवड्यात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सुरेश क्षीरसागर यांना एक वेगळाच पक्षी दिसला. त्यांनी लगेच आपल्या मोबाईलमध्ये पक्ष्याचा फोटो काढून पक्षी अभ्यासक संतोष धाकपाडे यांना दाखविला. त्याच दिवशी सुरेश आणि संतोष यांनी त्या परिसरातून जाऊन पक्ष्याचे निरीक्षण केले आणि कॅमेऱ्यात त्याच्या हालचाली टिपल्या. 

हा पक्षी कीटक आणि फळेही खातो. या पक्ष्याची घरटी झाडांवर असतात. हा पक्षी चूक-चूक आणि टीर-टीर असा आवाज काढतो. नर आणि मादी दोघेजण मिळून घरटी बनवतात. मादी तीन-चार अंडी घालते. हा पक्षी अधिक वेळ जमिनीवरच दिसून येतो. जमिनीवरील किडे, गांडूळ हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. 

नारंगी डोक्‍याचा कस्तुर हा पक्षी संकटग्रस्त आहे. आयुसीएन संस्थेच्या रेड लिस्टमध्ये या पक्ष्याचे नाव आहे. या पक्ष्याची संख्या गेल्या 10 वर्षांत 30 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. हा पक्षी 1956 मध्ये पहिल्यांदा हॉंगकॉंगमध्ये दिसून आला होता. हा पक्षी भारतासह बांगलादेश, श्रीलंका तसेच आशिया खंडात काही भागात आढळतो. या पक्ष्याचे संवर्धन करणे आवश्‍यक आहे. 
- रत्नाकर हिरेमठ, पक्षीप्रेमी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bird seen in solapur