परदेशातून सोलापुरात आलेत शिकारी पाहुणे!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

- पाईड हॅरियर हा पक्षी यंदाचे आकर्षण
- गवताळ प्रदेशाचे संवर्धन आवश्‍यक
- पक्ष्यांची संख्या कमी कमी होत आहे

सोलापूर : सोलापूर हे पक्ष्यांचं नंदनवन आहे हे आता सर्वांना माहीत आहेच. दरवर्षी हिवाळ्यात परदेशातून अनेक पक्षी स्थलांतर करून सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरात येतात. यावर्षी सुद्धा अनेक परदेशी पक्ष्यांचं सोलापुरात आगमन झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जवळजवळ सर्व शिकारी पक्ष्यांचं आगमन झाले असून यंदाचे आकर्षण म्हणजे पाईड हॅरियर हा पक्षी सोलापूरजवळील परिसरात प्रथमच आढळून आला आहे.

 

सोलापूर वन्यजीव संपदेने समृद्ध
पाईड हॅरियर हा शिकारी पक्षी हिवाळ्यात रशियातील अमूर नदीकाठी असलेल्या पर्वतरांगा, चीन आणि उत्तर-पूर्व कोरिया या देशातून प्रवास करीत दक्षिण भारत, पाकिस्तान आणि फिलिपिन्स या देशात येतो. जगातील विविध 16 प्रकारच्या हॅरियर पक्ष्यांपैकी सहा हॅरियर पक्षी भारतात स्थलांतर करून येतात. या सहा पैकी चार हॅरियर पक्षी सोलापुरात येतात हे सोलापूरनजीकचा गवताळ प्रदेश हे वन्यजीव संपदेने समृद्ध असण्याचे लक्षण आहे.

पक्ष्यांची संख्या कमी कमी होत आहे
मागील काही वर्षांपासून स्थलांतर करणाऱ्या या पक्ष्यांची संख्या कमी कमी होत आहे. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सोलापूरकरांनी विशेषत: वन्यजीवांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संघटनांनी तसेच वन विभागाने आपल्या गवताळ प्रदेशाचे संरक्षण, त्यावर होणारे मानवांचे अतिक्रमण आणि पक्ष्यांची शिकार याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे वाइल्ड लाइफ फोटोग्राफर डॉ. व्यंकटेश मेतन यांनी सांगितले.

हेही वाचा :  मोकाटांची दहशत 

शेतकऱ्यांचे मित्र...
या वर्षी मोन्टागो हॅरियर, पॅलिड हॅरियर, युरेशियन मार्श हॅरियर, पाईड हॅरियर, कॉमन केस्ट्रल, रेड नेक फाल्कन, युरेशियन स्पॅरो हॉक हे शिकारी पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून सोलापूर आणि सोलापूरच्या परिसरात आले आहेत. हे सर्व शिकारी पक्षी शेतकऱ्यांचे मित्र असून ते शेतीला उपद्रव करणाऱ्या मोठे किडे, कीटक, नाकतोडे, टोळ, उंदीर, घुशी, ससे यांची शिकार करून नैसर्गिक नियंत्रक म्हणून कार्य करतात.

अभ्यासक म्हणतात..
सोलापूर परिसरातील गवताळ प्रदेश हा भारतातील सर्वांत चांगला असा गवताळ प्रदेश असून तो वन्यजीव संपदेने समृद्ध आहे. आपल्या गवताळ प्रदेशात या पक्ष्यांना लागणारे अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने ते येथे येतात. आपल्या गवताळ प्रदेशाचे संवर्धन आणि याचे सकारात्मक मार्केटिंग केल्यास भारतातूनच नव्हे तर जगभरातून अनेक वन्यजीवप्रेमी, पक्षीप्रेमी वाइल्डलाइफ फोटोग्राफर्स सोलापूरला भेट देण्यास येतील.
- डॉ व्यंकटेश मेतन,
प्रसिद्ध वाइल्डलाइफ फोटोग्राफर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birds came to Solapur from overseas