भाजपचा 90 हजार कोटींचा घोटाळा - धनंजय मुंडे 

भाजपचा 90 हजार कोटींचा घोटाळा - धनंजय मुंडे 

सातारा - राज्यातील सोळा मंत्र्यांनी साडेतीन वर्षांत 90 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज हल्लाबोल आंदोलनानिमित्त गांधी मैदानावर आयोजित सभेत केला. 

"क्‍या आपको अच्छे दिन महसूस हो रहे है?' असा सवालही उपस्थितांना केला. शेतकरी आणि तरुणांबरोबरच मराठा, धनगर, लिंगायत व मुस्लिम समाजाची शासनाने फसवणूक केली आहे. त्यांची सर्व आश्‍वासने ही काल्पनिक आहेत. भूलथापांना बळी न पडता सरकार उलथून टाका, असे आवाहनही त्यांनी केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसची हल्लाबोल यात्रा आज जिल्ह्यात आली. दहिवडी व कोरेगाव येथील सभेनंतर सायंकाळी येथील गांधी मैदानावर सभा झाली. तत्पूर्वी सर्वमान्यांच्या उपस्थितीत शहरातून रॅली काढण्यात आली. गांधी मैदानावरील जनसमुदायसमोर बोलताना श्री. मुंडे म्हणाले, "2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोंदीनी देशभर सभा केल्या. प्रत्येक सभेत ते एक वाक्‍य उच्चारायचे.. अच्छे दिन. त्यावर समोरच्या लोकांतून आवाज यायचा "आणेवाले है.' काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना एक प्रश्‍न विचारला, "अच्छे दिन कब आयेंगे?' गडकरी म्हणाले, "अच्छे दिन कभी आते नही, वो महसूस करने पडते है.' नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारी, महागाई या सर्वांच्या स्थितीकडे पाहा आणि प्रामाणिकपणे सांगा, "क्‍या आपको अच्छे दिन महसूस हो रहे है?'' 

नरेंद्र मोदींप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनीही अनेक आश्‍वासने दिली होती. मात्र, कोणत्याही आश्‍वसनाची पूर्तता केली नाही. कर्जमाफीत शेतकऱ्यांची चेष्टा केली. मराठा, धनगर, लिंगायत तसेच मुस्लिम समाजाला आश्‍वासनांवर झुलवत ठेवत फसवत आहेत. राज्यातील सोळा मंत्र्यांनी 90 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केला आहे. पुराव्यासह तो समोर आणला. तरीही मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्‍लिनचिट दिली आहे. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सरकार उलथवून टाका, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे यांची भाषणे झाली. या वेळी पक्षाचे सर्व आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक उपस्थित होते. 

साताऱ्याचा मालक  कोणी एकटा नाही  
गांधी मैदानावरील सभेपूर्वी शहरातून काढलेल्या रॅलीला युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. नागरिकांनीही त्याला दाद दिली. साताऱ्यात आजही (कै.) भाऊसाहेब महाराजांचे विचार जिवंत आहेत. कोणी एकट्याने साताऱ्याचे मालक समजू नये. सातारा, जावळीसह जिल्ह्यातील सर्वजण राष्ट्रवादीच्या मागे भक्कम उभे आहेत, हे दाखविण्यासाठीच ही रॅली काढल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. 

आपल्या स्वयंपाकावर दुसऱ्याचा ताव  
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""आम्ही सर्वजण पक्षवाढीसाठी तळागाळात काम करतो. सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी, खासदार शरद पवार यांचा विचार रुजविण्यासाठी दिवसरात्र झटतो. त्यातून पक्षाची जिल्ह्यात ताकद निर्माण झाली आहे. मात्र, काही जण माझ्यामुळेच सगळे असे वेगळे चित्र रंगविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्वांची घुसमट होत आहे. चूल आम्ही रचायची, लाकडे आणायची, स्वयंपाक करायचा आणि त्यावर ताव दुसराच मारणार आणि वर जेवण कसे झाले म्हणणार, हे चुकीचे आहे. पक्षश्रेष्ठींनी याचा विचार करावा, असे म्हणत त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबद्दल विचार करण्याचे आवाहन पक्षश्रेष्ठींना केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com