...आणि भाजप नगरसेवकांनी विसरली गटबाजी

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 12 मे 2018

सभेचे कामकाज अधिनियानुसारच 
महापालिका सभेचे कामकाज अधिनियमानुसारच चालते याची कबुली नगरसिचव पी. पी. दंतकाळे यांनी अखेर आज दिली. या संदर्भात शिवसेनेचे गुरुशांत धुत्तरगावकर यांनी प्रश्‍न उपस्थित केला. त्यावेळी नोटीसीत चुकीचा उल्लेख झाला असून, तो दुरुस्त केला आहे. कामकाज हे महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसारच  चालते, असे स्पष्टीकरणही त्यांनी केले. 

सोलापूर : दलित वस्ती योजनेवरून बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्री विजय देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला. त्यावेळी भाजपचे सर्व नगरसेवक एकत्रित आले आणि पालकमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह बोललेले खपून घेतले जाणार नाही, असे प्रत्युतर दिले. गेल्या दीड वर्षांत पहिल्यांदाच भाजपचे सर्व नगरसेवक एका मुद्यासाठी एकत्रित आल्याचे दिसून आले. 

यापूर्वी पालकमंत्र्यावर आरोप झाले की सहकार मंत्री गटाचे नगरसेवक गप्प बसायचे. सहकार मंत्र्यावर आरोप झाले की पालकमंत्री गटाच्या नगरसेवकांची हाताची घडी तोंडावर बोट असे दृश्य दिसायचे. 

दलित वस्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांनी गेल्या अकरा महिन्यांत बैठक घेतली नाही. ते दलित विरोधी आहेत, असे श्री. चंदनशिवे म्हणाले. त्यास भाजपच्या प्रा. नारायण बनसोडे यांनी प्रत्युत्तर  दिले. अपुरे प्रस्ताव पाठविल्याने निधी मंजूर झाला नसल्याचे पालकमंत्र्यांनी कुठे सांगितले हे स्पष्ट करा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी चंदनशिवे आणि बनसोडे यांच्यात जोरदार चर्चा रंगली. 

आपले मुद्दे मांडत असताना चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांवर पुन्हा शरसंधान साधले. त्यावेळी भाजपचे सर्व नगरसेवक एकत्रित आले. हे पाहून, परिवहन कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी असे एकत्रित आला असता तर सत्ताधाऱ्यांना कर्मचाऱ्यांबाबत कळवळा आहे, असे दिसले असते, असा टोला शिवसेनेचे देवेंद्र कोठे यांनी लगावला.

परिवहनसंदर्भात विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेची सत्ताधाऱ्यांनी खिल्ली उडवली. त्याचा कांग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले,""तुम्ही विरोधात असताना महापालिकेत मटका फोड, गाढवआंदोलन, आयुक्तांच्या खुर्चीवर डुक्कर आणून बसविणे, अनेक अधिकाऱ्यांना काळे फासणे, स्वच्छतागृहात कोंडणे असे प्रकार झाले होते. त्या पद्धतीचे आंदोलन आम्ही केले नाही. कामगारांचा पगार मागणे गुन्हा असेल तर त्याची शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत.'' 

सभेचे कामकाज अधिनियानुसारच 
महापालिका सभेचे कामकाज अधिनियमानुसारच चालते याची कबुली नगरसिचव पी. पी. दंतकाळे यांनी अखेर आज दिली. या संदर्भात शिवसेनेचे गुरुशांत धुत्तरगावकर यांनी प्रश्‍न उपस्थित केला. त्यावेळी नोटीसीत चुकीचा उल्लेख झाला असून, तो दुरुस्त केला आहे. कामकाज हे महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसारच  चालते, असे स्पष्टीकरणही त्यांनी केले. 

महापौरांनी घेतली सोईची भूमिका 
परिवहनवर चर्चा सुरु असताना श्री. चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचा विषय चर्चेला आणला. त्यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी, परिवहनवर बोला अशी मागणी केली. त्यानुसार महापौरांनी आदेश दिला. तो मान्य करून चंदनशिवेंनी परिवहनवर भाष्य केले. भाजपचे प्रा. बनसोडे यांनी परिवहन ऐवजी पालकमंत्र्यावर भाष्य सुरु केले, त्यावेळी महापौर काहीच बोलल्या नाहीत. त्यामुळे सर्वच विरोधकांनी त्यांच्या या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. सर्व विरोधक एकत्रित आल्याचे पाहून, बनसोडेंना परिवहनवरच बोलण्याची ताकीद महापौरांना द्यावी लागली. 

Web Title: BJP corporater in Solapur Municipal Corporation