महापौरांसह पाचजणांनी माझ्यावर विषप्रयोग केला : भाजप नगरसेवक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

दोन्ही मंत्र्यांचा संबंध नाही
हा प्रकार उघडकीस आल्यावर या प्रकरणाशी पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचीही नावे जोडण्यात आली होती. मात्र, त्यात काहीही तथ्य नसल्याचे  पाटील यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, पालकमंत्री देशमुख आरोग्य राज्यमंत्रीही आहेत. त्यांना मला संपवायचे असते तर एखाद्या डॅाक्टरला हातशी धरून त्यांचा हेतू साध्य करून घेतला असता. पण उलट ते माझ्यावर चांगल्यातले चांगले उपचार व्हावेत यासाठी प्रयत्नशील राहिले.

सोलापूर : महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह पाचजणांनी माझ्यावर थेलियम देऊन विषप्रयोग करून मला मारण्याचा प्रयत्न केला,असा दावा माजी सभागृह नेते तथा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत केला. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
महापौर सौ. बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, राज्य शिखर बॅंकेचे प्रशासकीय संचालक अविनाश महागावकर, नगरसेवक सुनील कामाठी आणि भाजपचे शहराध्यक्ष
प्रा. अशोक निंबर्गी ही पाच संशयितांची नावे आहेत, असे श्री. पाटील म्हणाले. या संदर्भात जोडभावी पेठ पोलिस चौकीत जबाब देऊनही फिर्याद घेतली गेली नाही, त्यामुळे पत्रकार परिषद घेतली, असे ते म्हणाले.

सुमारे नऊ महिन्यांपूर्वी श्री. पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोलापुरात पुरेसे उपचार होत नसल्याने त्यांना पुणे
आणि त्यानंतर मुंबईतल्या रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्यांना थेलिमय देण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यावेळी पाटील यांचे चिरंजीव बिपीन यांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती. पालकमंत्री विजय देशमुख यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला त्यानंतरही या प्रकरणाची चौकशी अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात आल्यानंतर त्यांच्याकडेही याबाबत तक्रार करण्यात आली व सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. मात्र त्यातही काहीच प्रगती झाली नाही, उलट तपास यंत्रणेवर दबाव येत असल्याचे स्पष्ट झाल्याने आज माध्यमांसमोर
श्री. पाटील यांनी या संदर्भातील माहिती दिली. 

पाटील म्हणाले, पक्षात आपले वाढत चाललेले वर्चस्व काहीजणांना आवडले नाही. त्यामुळे हे कटकारस्थान करण्यात आले. शहरात मटका जोरात सुरू असून,तेच
या प्रकरणात पोलिसांना मॅनेज करीत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले, मात्र त्यांच्यावरही दबाव टाकण्यात आला आहे. पक्षातील गद्दारांना तातडीने काढून टाकावे आणि त्यांच्यावर कारवाई करावी.

दरम्यान, शहराध्यक्ष प्रा. निंबर्गी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळला असून, संशयितांतील काही नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आली आहेत, असा दावा केला. तसेच गेल्या चार वर्षांपासून मी आणि श्री. पाटील कधीच एकत्रित आलो नाही आणी साधा चहाही पिला नाही, असे त्यांनी सांगितले. महापौर शोभा बनशेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता, त्या महापालिकेच्या बैठकीत असून, दोन तासानंतर बोलतील असे सांगण्यात आले. श्री. महागावकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. 

दोन्ही मंत्र्यांचा संबंध नाही
हा प्रकार उघडकीस आल्यावर या प्रकरणाशी पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचीही नावे जोडण्यात आली होती. मात्र, त्यात काहीही तथ्य नसल्याचे  पाटील यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, पालकमंत्री देशमुख आरोग्य राज्यमंत्रीही आहेत. त्यांना मला संपवायचे असते तर एखाद्या डॅाक्टरला हातशी धरून त्यांचा हेतू साध्य करून घेतला असता. पण उलट ते माझ्यावर चांगल्यातले चांगले उपचार व्हावेत यासाठी प्रयत्नशील राहिले. सहकारमंत्री देशमुख हेसुद्धा असे करू शकणार नाहीत. या दोन्ही मंत्र्यांच्या बगलबच्च्यानीच हा प्रकार केला आहे. उपमहापौर शशीकला बत्तुल यांनाही धमकाविण्यात आले आहे. त्याचे अॅाडिअो क्लिप आमच्याकडे उपलब्ध आहेत. महापालिकेच्या काही निर्णयांमध्ये मी हस्तक्षेप केल्याने संबंधितांचा हेतू साध्य झाला नाही, त्यामुळे अशा पद्धतीने माझा काटा काढण्याचा प्रयत्न झाला, असेही पाटील म्हणाले. 
 

Web Title: BJP corporater Suresh Patil allegations on BJP Mayor in Solapur