भ्रष्टाचारमुक्त विकासपर्वाचा प्रारंभ

सांगली - भाजपच्या महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर यांच्यासह नगरसेवकांची काढण्यात आलेली मिरवणूक.
सांगली - भाजपच्या महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर यांच्यासह नगरसेवकांची काढण्यात आलेली मिरवणूक.

सांगली - महापालिकेत आजपासून  भ्रष्टाचारमुक्त विकास पर्वाचा प्रारंभ झाला आहे. जनतेने विश्‍वासाने भाजपच्या हातात सत्ता दिली आहे. स्वच्छ, पारदर्शी कारभार करून तीनही शहरांचा समतोल विकास साधण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही भाजपच्या पहिल्या महापौर संगीता खोत यांनी आज दिली.

महापौर खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर यांच्यासह भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मिरवणुकीने महापालिकेत जाऊन पदग्रहण केले.

महापालिकेत प्रथमच भाजपची स्पष्ट बहुमताने सत्ता  आली आहे. त्यानंतर महापौर, उपमहापौर पदाची निवड गेल्या सोमवारी झाली होती. मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे भाजपने विजयोत्सव टाळला होता. आज सकाळी स्टेशन  चौकातून महापालिकेपर्यंत विजयी मिरवणूक निघाली. नूतन पदाधिकाऱ्यांसह भाजपचे सर्व नगरसेवक सहभागी झाले. फेटे बांधून निघालेली ही मिरवणूक भाजपचे शहरातील शक्तिप्रदर्शन होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, सुरेश आवटी, दिलीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

श्रावणधारां वर्षावात ढोल ताशांच्या गजरात फटाक्‍यांच्या दणक्‍यात मिरवणूक निघाली. सर्वांनी भगवे फेटे परिधान केल्याने वातवरण भगवे झाले होते. पावसाने काही वेळातच विश्रांती घेतल्याने महापालिकेपर्यंत मिरवणूक जल्लोषात पार पडली. मिरवणुकीत धनगरी ढोल पथकही सहभागी झाले होते. स्वागतासाठी आज महापालिकेत रांगोळी काढण्यात आली होती. पदाधिकाऱ्यांच्या कक्षापर्यंत फुलांच्या पाकळ्यांची उधळण केली होती. कक्षातील गणेशमूर्तीला पुष्पहार घालून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट देखील महापालिकेत दाखल झाले. त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर आणि सरचिटणीस मकरंद देशपांडे होते. श्री. बापट यांनी महापौर खोत यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उपमहापौर व गटनेत्यांनी आपापल्या कक्षात पदभार स्वीकारला.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला निधी तसेच वित्त आयोगाच्या प्राप्त २५ कोटींच्या निधीतून प्राधान्यक्रमाने भाजी मंडई, क्रीडांगणे, बागा ही कामे मार्गी लावू. एकजुटीने कारभार करून सर्व शहरांचा समतोल विकास साधू.
- संगीता खोत, महापौर

मागील सत्ताकाळातील गैरव्यवहाराच्या चौकशी केली जाईल. महापालिकेचा कारभार गतिमान होईल.
- धीरज सूर्यवंशी, उपमहापौर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com