"झिरो ते हिरो' होण्यासाठी भाजपची तयारी 

निखिल पंडितराव
शुक्रवार, 5 मे 2017

कोल्हापूर - लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजून दोन ते सव्वा दोन वर्षे असली भारतीय जनता पक्षाने (भाजप) या दोन्ही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यामध्ये भाजपने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली दोन वर्षात पक्ष विस्तारासाठी केलेले काम पाहता ""झिरो ते हिरो'' होण्यासाठीची नियोजनबद्ध मोर्चेबांधणी सुरवात झाली आहे. 

कोल्हापूर - लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजून दोन ते सव्वा दोन वर्षे असली भारतीय जनता पक्षाने (भाजप) या दोन्ही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यामध्ये भाजपने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली दोन वर्षात पक्ष विस्तारासाठी केलेले काम पाहता ""झिरो ते हिरो'' होण्यासाठीची नियोजनबद्ध मोर्चेबांधणी सुरवात झाली आहे. 

भाजपची अनेक वर्षापासून जिल्ह्यातील राजकीय ताकद नगण्य अशीच होती. बोटावर मोजण्याइतपत कार्यकर्ते होते, परंतु लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने पक्षाचा विस्तार आणि गल्ली ते दिल्ली, असे धोरण ठेवत सर्वत्र भाजप हे सूत्र ठेवून वाटचाल सुरू ठेवली आहे. विशेषतः जिल्ह्यातील राजकारणातील महाडिक गटाची ताकद सोयीनुसार भाजपने आपल्याबरोबर घेतली आणि ग्रामपंचायतीपासून आपला पक्ष सत्तेत आणण्याचा प्रयत्न केला, यातूनच पहिल्यांदा जिल्हा परिषदेमध्ये भाजपने झेंडा फडकवला आहे. आता सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी थंडावल्याने आता लोकसभा आणि विधानसभा हेच लक्ष्य ठेवले आहे. 

लोकसभेला काय होईल? 
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात सध्या राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक खासदार आहेत. परंतु पालकमंत्री श्री. पाटील यांच्याशी असलेले राजकीय संबंध पाहता आणि 1 मे रोजी पालकमंत्री पाटील यांनी खासदार महाडिक केंद्रीय मंत्री व्हावेत, अशी व्यक्त केलेली अपेक्षा पाहता ते 2019 ला भाजपचे उमेदवार असल्याची भाकिते वर्तवली जात आहे. परंतू लोकसभेला शिवसेना व भाजपने युती करून निवडणूक लढवली तर खासदार महाडिक यांची अडचण होण्याची शक्‍यता आहे. कोल्हापूर लोकसभा मतदार संघ शिवसेनेकडे असल्याने भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविणे खासदार महाडिकांना अवघड जाईल, नाहीतर मग शिवसेनेला अन्य एखादा मतदार संघ देऊन कोल्हापूर मतदारसंघ भाजपला घ्यावा लागेल. त्यातही राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. महाडिकांशी राजकीय संघर्ष असलेले आमदार सतेज पाटील यांची भूमिका ही त्यावेळी महत्त्वाची ठरणार आहे. म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि सुहास लटोरे यांच्याकडे भाजपने लोकसभेची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे लोकसभेच्या रणभूमीत "सरदार' पुढे गेले आहेत. केवळ नेता येणे बाकी अशी स्थिती आहे. 

हातकणंगले मतदार संघात खासदार राजू शेट्टी हे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडणूक आले, परंतु 2014 च्या निवडणुकीत भाजपने व शिवसेनेने या ठिकाणी उमेदवारच दिला नव्हता, त्यामूळे श्री. शेट्टी यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला, परंतू सध्या खासदार श्री. शेट्टी हे भाजपवर जोरदार टिका करत आहेत, त्यातही राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना भाजपने दिलेले महत्त्व यामुळे खासदार श्री. शेट्टी यांच्याविरुद्ध यावेळी भाजप आपला उमेदवार निवडणुकीत उतरवण्याची शक्‍यता आहे. या मतदारसंघात भाजपला उमेदवार आयात करावा लागणार आहे. आवाडे किंवा माने घराण्यातील उमेदवार रिंगणात आला तर आश्‍चर्य वाटणार नाही. 

विधानसभेमध्ये काय होईल? 
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला दहा मतदार संघात उमेदवार उभे करणे शक्‍य झाले आहे. लोकसभेमध्ये असलेली शिवसेनेची युती तुटल्याने स्वतंत्रपणे निवडणुक लढविली. यावेळी राज्यातून 170 आमदारांचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या भाजपचे कोल्हापूर दक्षिणमधून आमदार अमल महाडिक आणि इचलकरंजीतून आमदार सुरेश हाळवणकर हे आमदार जिल्ह्यात आहेत. शिवसेनेचे सहा आमदार जिल्ह्यात असून यामधील दोन आमदार 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर रिंगणात उतरण्याच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या सत्ता संघर्षामध्ये आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्याशी पालकमंत्री श्री. पाटील यांची वाढलेली जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे. त्याचप्रमाणे गडहिंग्लज, आजरा आणि चंदगडमध्ये आत्तापर्यंत कधीच अस्तित्त्व नसलेली भाजप ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेमध्ये आल्याने तेथेही भाजपने आपली व्होट बॅंक तयार केली आहे. नंदाताई बाभूळकर या भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे, तर तेथूनच गोपाळराव पाटील हे भाजपमधून रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. शाहूवाडी, हातकणंगलेमध्ये निर्णय घेताना भाजपला माजी आमदार विनय कोरे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुत श्री. कोरे यांनी घेतलेली झेप पाहता तेथे जनसुराज्य भाजपच्या पाठिंब्यावर रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. राधानगरीमध्ये सध्या भाजपमध्ये अन्य पक्षातून कार्यकर्ते प्रवेश करत आहेत, त्यातील तेथील आणखीन एक मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामूळे या नेत्यालाच तेथून तिकीट देण्याची शक्‍यता आहे. कोल्हापूर उत्तरमधून राजघराण्यातील सूनबाईंना रिंगणात उतरवण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे, परंतू त्यांच्या घराण्यातील निर्णय प्रलंबित असल्याने सध्या भाजपनेही वेट अँण्ड वॉचची भूमिका ठेवली आहे. कागलमधून म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या उमेदवारीचे वातावरण आहे. "लक्ष्य 2019' म्हणून त्यांनी जाहिर केले आहे. त्यामूळे दहा पैकी कागल, कोल्हापूर दक्षिण आणि इचलकरंजी या मतदार संघातील विधानसेभेचे उमेदवार फिक्‍स झाले असून करवीर व हातकणंगले ही जवळपास निश्‍चित आहेत. उर्वरीत मतदार संघातील उमेदवारही लवकरच स्पष्ट होतील, अशी शक्‍यता आहे. 

दादांचे संघटन कौशल्य 
पहिल्यांपासूनच "सबका साथ सबका विकास' हे धोरण ठेवून काम करणारे पालकमंत्री पाटील यांनी पश्‍चिम महाराष्ट्रत भाजपच्या विस्तारावर अधिक भर दिला आहे. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झपाट्याने सुरू केलेले विकास कामे आणि पक्ष विस्तारासाठी अनेक नेत्यांचा पक्ष प्रवेश किंवा सोयीनुसार आघाडी हे काम भाजपकडून दोन वर्षापासून सुरू आहे. पालकमंत्री श्री. पाटील यांच्या संघटन कौशल्यामूळे भाजपचा विस्तार वाढत आहे, हे मात्र निश्‍चित.

Web Title: BJP election preparations