भाजप सरकार 'आरएसएस'चे बाहुले : कुमार सप्तर्षी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

आनंदराव आणि प्रेमलाताई चव्हाण हे मुळचे शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेत वाढले होते. मात्र, कॉंग्रेसने त्या पक्षाची ध्येय, धोरणे स्वीकारल्यामुळे ते कॉंग्रेसवासी झाले. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कॉंग्रेसची विचारधारा जपली.

कऱ्हाड : कॉंग्रेस संपली असे कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी काँग्रेस पक्षाची घटना लिहिली. त्यामध्ये कोणताही जात, धर्म नसल्यामुळे देशातील सर्व लोक आनंदी होते, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले. सध्याचे भाजप सरकार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) बाहुले झाले आहे, असेही ते यावेळी म्हणाले. 

(कै.) प्रेमलाताई चव्हाण एज्युकेशन फौंडेशन व जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने आज येथे स्व. आनंदराव चव्हाण व प्रेमलाताई चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार मदन भोसले, संजय बालुगडे, अॅड. सुरेश कुऱ्हाडे, महिला कॉंग्रेसच्या रजनी पवार, धनश्री महाडीक, बाळासाहेब बागवान, जगन्नाथ शिंदे, अजित पाटील, हिंदूराव पाटील, राहुल घाडगे, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, निवास थोरात, गलांडे आदिंसह मान्यवर उपस्थित होते. 

सप्तर्षी म्हणाले, सध्या संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण आहे. कोणाला वाटत असेल काँग्रेस संपली. तर तो त्यांचा भ्रम असेल. आज कॉंग्रेस कात टाकून नवीन होऊ लागली आहे. त्यामुळे कोणी कॉंग्रेस सोडून जाऊ नका. दिवंगत इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली आणि पुन्हा देशाची माफी मागितली होती. त्यामुळे या देशाने त्यांना पुन्हा सत्तास्थानी बसवले होते, अशीच नेमकी परिस्थिती भविष्यात निर्माण होईल. 

आनंदराव आणि प्रेमलाताई चव्हाण हे मुळचे शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेत वाढले होते. मात्र, कॉंग्रेसने त्या पक्षाची ध्येय, धोरणे स्वीकारल्यामुळे ते कॉंग्रेसवासी झाले. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कॉंग्रेसची विचारधारा जपली. त्यांचाच वारसा पुढे पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉंग्रेसच्या पडत्या काळातही अखंडीतपणे सुरू ठेवला आहे.

चव्हाण म्हणाले, आगामी निवडणुकीत पुन्हा भाजपाची सत्ता झाल्यास लोकशाही संपूण हुकूमशाही राजवट तयार होईल. पुन्हा कधीही निवडणुका होणार नाहीत.त्यांची प्रवृत्ती लक्षात घेऊन हीच वेळ आहे त्यांना त्यांची जागा दाखवण्याची. लोकशाहीला वाचविण्यासाठी सर्वांनी समाजवादी काँग्रेसचा पुरस्कार करावा.

आमदार आनंदराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. मदन भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. तर नगरसेविका स्मिता हुलवान यांनी आभार मानले.

Web Title: BJP government is Listening RSS