भाजप सरकार सर्व पातळ्यांवर अयशस्वीच - अशोक चव्हाण

कऱ्हाड - काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा रविवारी रात्री येथे पोचली. त्या वेळी झालेल्या जाहीर सभेत बोलताना अशोक चव्हाण. शेजारी हर्षवर्धन पाटील, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, विश्वजित कदम आदी.
कऱ्हाड - काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा रविवारी रात्री येथे पोचली. त्या वेळी झालेल्या जाहीर सभेत बोलताना अशोक चव्हाण. शेजारी हर्षवर्धन पाटील, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, विश्वजित कदम आदी.

कऱ्हाड - भारतीय जनता पक्ष म्हणजे घोषणांचा बाजारच आहे. भाजप सरकार सामाजिक, आर्थिक, कायदा व सुव्यवस्थेच्या पातळीवर अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे सामान्यात असंतोष आहे. त्या सामान्यांना न्याय मिळावा, यासाठीच जनसंघर्ष यात्रा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. 

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा काल रात्री येथे आली. त्या वेळी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात जाहीर सभा झाली. त्यात ते बोलत होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बंटी ऊर्फ सतेज पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, आमदार शरद रणपिसे, सचिन सावंत, जयकुमार गोरे, विश्वजित कदम, आनंदराव पाटील, अमरजित काळे, डॉ. इंद्रजित मोहिते, शहराध्यक्ष राजेंद्र ऊर्फ अप्पा माने, तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे उपस्थित होते. श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘संस्था पोखरणे, विचारसरणी लादणे, समाजहिताचे विचार संपवणे अशा प्रकारचे काम सध्याचे सरकार करत आहे. किती खोटे बोलावे याच्या मर्यादा भाजप सरकारने ओलांडल्या आहेत. कोण किती खोटे बोलतो हेच त्यांचे त्यांना कळेना अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात सामान्य आता एकवटू लागले आहेत. देश व राज्यातही भाजप सरकारमुळे मोठी कठीण स्थिती निर्माण झाली आहे.

सामाजिक पातळीवरील वातावरण दुभंगून ठेवून विचारांना संपणाऱ्या भाजप सरकारला नक्की काय साध्य करायचे ते आता सगळ्यांनी ओळखले आहे. ज्यांना अटक करायची त्यांचा सन्मान करणाऱ्या व ज्यांचा सन्मान करायचा त्यांना अटक करणारे विचार वाढत आहेत. त्यांना वेळीच रोखण्यास सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. इव्हीएम मशिनच्या जिवावर सत्ता आणणाऱ्या भाजपने बॅलेट पेपरवर (मतपत्रिकेवर) निवडणुकांना सामोरे जाऊन विजय मिळवून दाखवावा. ते शक्‍य नसल्यानेच त्यांना त्याची भीती वाटते आहे.’’ 

विरोधी पक्षनेते विखे- पाटील म्हणाले, ‘‘विकासाचा ठेका आपण घेतल्याचा आव आणून दिशाभूल करणारी माहिती देण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. स्वप्नरंजन सरकार सामान्यांना मारकच आहे. सनातनी विचारांना पाठीशी घालून शाहू, फुले, आबंडेकरांचा विचार संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची विचारसरणी ठेवणारे देशद्रोही ठरवले जात आहे. ज्यांच्याकडे बाँब सापडले. त्यांचा ‘ब्रेन’ कोण आहे, ते शोधण्याची गरज आहे. ‘सनातन’च्या जयंत आठवलेंना अटक झाली म्हणजे त्यातील ‘ब्रेन’ समजेल. मात्र, त्यांना अटक करण्यास सरकार तयार नाही. 

येथे हिताचे विचार ठेवणारे व समाज सुधारण्यासाठी प्रयत्न करणारे देशद्रोही ठरवले जात आहेत. भीमा- कोरेगाव येथे झालेल्या दंगलीतील संशयित मिलिंद एकबोटे पोलिसांना सापडत नाहीत. मात्र, त्याचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर तो एका तासात सापडतो. हे नक्की काय आहे, ते आता वेगळ सांगायची गरज नाही. सनातनी विचारांना लादणाऱ्या भाजप सरकारला आता वेळीच थांबवण्याची गरज आहे. त्यांना सरकार चालवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे त्यांनी देशाची व्यवस्थाच मोडीत काढली आहे.’’

या वेळी पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, हर्षवर्धन पाटील, आनंदराव पाटील, सचिन सावंत, अमरजित काळे, विश्वजित कदम यांच्यासह अनेक वक्‍त्यांची भाषणे झाली. ॲड. संभाजी मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. मनोहर शिंदे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com