कोल्हापूरच्या जागेसाठी भाजप आग्रही

कोल्हापूरच्या जागेसाठी भाजप आग्रही

कोल्हापूर - लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची शिवसेनेच्या वाट्याला असलेली जागा आपल्याला मिळावी, यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या संदर्भात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत खलबते सुरू आहेत. कोल्हापूरच्या बदल्यात शिवसेनेला मुंबईतील उत्तर-पूर्व मुंबईची जागा देण्याचा प्रस्ताव समोर असल्याचे समजते. 

गेली पाच वर्षे एकमेकांवर संधी मिळेल तेथे टीकास्त्र सोडणाऱ्या शिवसेना व भाजपची युती होणार नाही, अशीच शक्‍यता होती; पण होय, नाही म्हणत गेल्या आठवड्यात युती झाली. त्यात भाजपला २५, तर शिवसेनेच्या वाट्याला २३ जागा आल्या आहेत. यात विद्यमान खासदार असलेल्या पक्षांच्या जागा त्या त्या पक्षाला जातील; पण ज्याठिकाणी कोणाचाच खासदार नाही, अशा काही जागा बदलल्या जाण्याची शक्‍यता आहे. त्यात कोल्हापूरच्या जागेचा समावेश आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता गेल्या वर्षापासून शिवसेना-भाजपची युती आहे; तेव्हापासून १९९६ ची निवडणूक वगळता या लोकसभेच्या दोन्हीही जागा शिवसेनेच्या वाट्याला आहेत. १९९६ मध्ये त्यावेळच्या इचलकरंजी व आताच्या हातकणंगले मतदारसंघातून भाजपने गणपतराव सरनोबत यांना उमेदवारी दिली होती; मात्र बहुतांशी निवडणुकीत शिवसेनेला पक्षापेक्षा ऐनवेळी पक्षात आलेल्यांनाच उमेदवारी देण्याची वेळ आली. 

आता कोल्हापूरची जागा भाजपला मिळावी, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेच प्रयत्नशील आहेत. ‘होमटाऊन’मध्ये लोकसभेची एक तरी जागा आपल्याला हवी, हा प्रयत्नामागचा एक भाग आहे. त्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही गेल्या आठवड्यात चर्चा झाल्याचे समजते. युती झाली असली तरी काही ठिकाणी भाजपचे विद्यमान खासदार शिवसेनेला नको आहेत.

विशेषतः मुंबई आणि पुण्यात ही स्थिती आहे. मुंबईच्या उत्तर-पूर्व मतदारसंघाचे खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. सेना-भाजपच्या वादात श्री. सोमय्या यांनी शिवसेना व श्री. ठाकरे यांच्यावर अतिशय टोकाची टीका केली होती. यावरून एकवेळी दोन्हीही गट आमने-सामनेही आले होते. त्यामुळेच सोमय्या यांची जागा शिवसेनेला देऊन त्या बदल्यात कोल्हापूर पदरात पाडून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. येत्या आठ-दहा दिवसांत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे.

उमेदवार ऐनवेळी ठरणार
युतीनंतर दोन्हीही पक्षांच्या बहुतांशी विद्यमान खासदारांची उमेदवारी कायम राहील. युतीचे मिळून राज्यात ४८ पैकी ४१ खासदार आहेत. उर्वरित सात जागांची झाली, तर अदलाबदल शक्‍य आहे. त्यातून कोल्हापूर भाजपच्या वाट्याला आलेच तर उमेदवार निश्‍चित आहे; पण त्यांचे नाव ऐनवेळी जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com