Vidhan Sabha 2019 : 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली'; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला

Chandrakant-Patil
Chandrakant-Patil

बारामती : 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली' अशी पवार कुटुंबीयांची अवस्था झालेली आहे. आमची चौकशी लावा, आम्हाला फरक पडत नाही, कर नाही त्याला डर कशाला हवी, आम्ही चौकशीला सामोरे जाऊ, आम्ही रडत बसणार नाही, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता.18) बारामतीतील सभेत अजित पवार आणि शरद पवार यांचे नाव न घेता लगावला.

बारामतीचे भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ शहरातील शारदा प्रांगणात आयोजित सभेत चंद्रकांत पाटील बोलत होते. आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि अजित पवार यांना टीकेचे लक्ष्य केले.

बारामतीकरांनी यंदाच्या निवडणुकीत चमत्कार करून त्याचे साक्षीदार व्हायला हवे, असे आवाहन करीत बारामतीत भाजपचे कमळ फुलवा, अशी हाक त्यांनी दिली. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ईडी चौकशी अशा अनेक विषयांना त्यांनी हात घातला.

आम्हाला धनगर आरक्षण का दिले नाही म्हणून विचारता? केंद्रात आणि राज्यात गेले अनेक वर्षे तुमची सत्ता होती, तुम्ही धनगर समाजाला आरक्षण दिले नाही? असा उलट सवाल पाटील यांनी केला. मराठा आरक्षण स्थगितीची खोटी क्लिप समाज माध्यमांत फिरवली जात आहे, प्रत्यक्षात मराठा आरक्षण आम्ही दिले आणि ते न्यायालयात टिकवूनही दाखवले, असे पाटील म्हणाले.

370 कलम रद्द केल्यामुळे पवारांच्या पोटात दुखतंय. महाराष्ट्रामध्ये 220 नव्हे, तर 250 जागांवर भाजप विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील 144 जागा जिंकण्यासाठी एक कोटी 70 लाख मतांची आवश्यकता लागते. मात्र, लोकसभेचा निकाल पाहता भाजप-शिवसेना युतीला दोन कोटी 74 लाख मते मिळाली आहेत. त्यामुळे 220 च्या जागा 250 होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजकारणाला कंटाळलेल्या अजित पवार यांना एका दिवसातच पुन्हा राजकारणात येऊन निवडणूक लढवण्याचा साक्षात्कार कसा काय झाला? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला. ज्यांचा आत्मविश्वास गेलेला आहे, अशा अजित पवारांना निवडून देणार की तरुण-तडफदार गोपीचंद पडळकर यांच्या मागे तुमची ताकद उभी करणार, असे म्हणत पडळकरांना निवडून देण्याचे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com