सोलापुरात 'धाकल्या मालकां'चा पत्ता होणार 'ओपन' 

solapur
solapur

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना तब्बल 63 हजार 667 मताधिक्‍य मिळवून देत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री विजय देशमुख (थोरले मालक) यांनी मतदारसंघावरील आपली पकड किती मजबूत आहे हे दाखवले . गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मिळालेले मताधिक्‍क्‍य हे तब्बल 21 हजार 754 ने अधिक आहे. त्याचाच फायदा घेत यंदा श्री. देशमुख आपले चिरंजीव नगरसेवक डॉ. किरण देशमुख (धाकले मालक) यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरण्याचे संकेत मिळत असून, ते स्वतः अक्कलकोटमधून निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसे झाल्यास भाजपची एक जागा वाढण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

पालकमंत्री श्री. देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यात सुरू असलेले शीतयुद्ध निवडणुकीच्या कालावधीत सुरूच होते. वंचित बहुजन आघाडीला मानणारा मतदार मोठ्या प्रमाणावर "शहर उत्तर'मध्ये आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचे मताधिक्‍य घटेल आणि पालकमंत्र्यांवर त्याचा ठपका आपोआप येईल, असे अंदाज पालकमंत्री विरोधी गटातील लोकांकडून सुरू होते. प्रचाराच्या कालावधीत ते वेळोवेळी दिसूनही आले. प्रत्यक्ष मतमोजणीनंतर उलटे झाले आणि पक्षांतर्गत विरोधकांचे सर्व अंदाज चुकवित तब्बल 63 हजारांचे मताधिक्‍क्‍य भाजपच्या उमेदवारास मिळवून देण्यात पालकमंत्री यशस्वी झाले. 

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कट्टर समर्थक असलेल्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा मागेच केली आहे. महापालिकेच्या अनेक निर्णयात पालकमंत्र्यांनी "खोडा' घातल्याचे बिंबविण्यात पालकमंत्री विरोधी गटातील नगरसेवक काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत. उमेदवारीसाठी महापौरांनी थेट "वर्षा' निवासस्थानातून प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, या मतदारसंघात "मालकां'नी मिळवलेल्या मतधिक्‍क्‍यामुळे "ताईं'च्या प्रयत्नाला किती यश मिळते हे काळच ठरविणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री श्री. देशमुख यांनी जिल्हा आणि राज्यातील प्रचार यंत्रणेत सहभाग नोंदवला. त्यामुळे शहर उत्तर मतदारसंघाची जबाबदारी ही डॉ. किरण यांच्यावर टाकण्यात आली आणि त्यांनीही ती यशस्वीपणे पेलून दाखवली. "बाप से बेटा सवाई...' या उक्तीप्रमाणे गत निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्‍यापेक्षा जास्त मताधिक्‍य मिळवण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. किरण यांचे नाव पुढे येऊ लागले आहे. संयमी व शांत स्वभावाचे असलेले डॉ. किरण यांनी महापालिकेच्या कामकाजातही आपला वेगळा ठसा उमटविला आहे. या मतदारसंघातील भाजपची मजबूत पकड पाहता भाजपच्या श्रेष्ठींनी डॉ. किरण यांच्या उमेदवारीस हिरवा कंदील दाखविल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. 

संभाव्य इच्छुक उमेदवार 
पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी व डॉ. किरण देशमुख (भाजप), प्रकाश वाले, सुदीप चाकोते, राजन कामत (कॉंग्रेस), मनोहर सपाटे, संतोष पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस), नगरसेवक आनंद चंदनशिवे (वंचित बहुजन आघाडी) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com