भाजप नेत्यांना तंटामुक्तीचे आदेश

भाजप नेत्यांना तंटामुक्तीचे आदेश

प्रदेश गंभीर - खासदारांसमोर देशमुख, घोरपडेंशी जुळवून घेण्याचे आव्हान

सांगली - राज्यातील सत्तेच्या लाभासाठी भाजपमध्ये जिल्ह्यात सुरू असलेल्या लाथाळ्या प्रदेश पातळीवर गांभीर्याने घेतल्या गेल्या आहेत. नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या आधी नेत्यांनी तंटामुक्ती करून घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. भांडणाचा पक्षाच्या कामगिरीवर परिणाम झाल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत कानउघाडणी झाल्याने भाजप गोटात सध्या तंटामुक्तीच्या हालचाली सुरू आहेत. 

देशात व राज्यात लाटेवर सत्ता आल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्याचा भाजपचा मनोदय आहे. या पार्श्‍वभूमीवर सकल मराठा मोर्चाची लाट आली आणि त्याच्या परिणामांच्या चिंतेने भाजपला हैराण करून सोडले. एकीकडे ही चिंता तर दुसरीकडे ‘मूलवासी’ आणि ‘आयत्या वेळचे’, अशा भाजपमधील दोन गटांत संघर्ष सुरू असल्याने वरिष्ठ पातळीवर चिंता वाढणे साहजिक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांत मुसंडी मारल्याशिवाय गट व पक्ष टिकून राहणार नाही, याची पक्की जाणीव भाजप नेत्यांना आहे. ‘अभी नहीं तो कभी नहीं’ अशी परिस्थिती त्यांनी हेरली आहे. त्यामुळे राज्यभरात संघर्षाला कुठेतरी विराम देऊन पक्षहितासाठी पुढे या, असे आवाहन केले जात आहे.  जिल्ह्यातील संघर्षाची गाथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तोंडपाठ आहे. विशेष म्हणजे त्यांच्या इस्लामपूर व कडेगाव दौऱ्यावेळी ती त्यांनी अनुभवली आहे. देशमुख यांच्या केन ॲग्रो कारखान्यावरील शेतकरी मेळावा होऊ नये, यासाठी भाजपचाच एक गट कार्यरत होता, अशा चर्चा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या होत्या; शिवाय खासदार पाटील यांच्याशी देशमुख, घोरपडे यांचा सुरू असलेला संघर्ष सर्वज्ञात आहे. आता प्रदेशकडूनच सूचना आल्याने कोण काय भूमिका घेणार, याकडे लक्ष असेल.

भांडण कुणाचे कुणाशी
काका-बाबा

खासदार संजय पाटील आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात वालचंद अभियांत्रिकी कॉलेज प्रकरणावरून उभा संघर्ष मांडला गेला. एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरली गेली. त्यानंतर दोन वेळा हे नेते व्यासपीठावर आले, मात्र एका पक्षात राहून भिंत कायम आहे. पक्षासाठी हा चिंतेचा विषय असून दोन मातब्बर नेत्यांतील कबड्डी निवडणुकीत त्रासदायक होऊ शकते, असे भाजपमधील जाणकारांनी मत नोंदवले आहे.

काका-घोरपडे
खासदार पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यात संघर्ष टोकाला गेला आहे. मध्यंतरी दोन्ही नेत्यांनी अबोला धरला होता. जिल्हा बॅंकेत खासदारांनी जयंत, मदन पाटील यांच्याशी जुळवून घेताना घोरपडे यांना बाजूला काढले. त्याचा राग मनात धरून घोरपडे यांनी बाजार समितीत पतंगराव कदम यांच्याशी आघाडी केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील संशयकल्लोळानंतर दोघांतील दरी वाढतच गेली आहे. ती अजून भरलेली नाही. एकाच विधानसभा मतदारसंघातील या मातब्बरांत संघर्ष भाजपला परवडणारा नाही.

शेंडगे-पडळकर
राष्ट्रवादीत असलेले माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि भाजपचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांच्यात सध्या सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यात प्रकाश शेंडगे यांचे छोटे बंधू रमेश शेंडगे हे भाजपचे नेते आहेत. शेंडगे-पडळकरांतील संघर्षाचा परिणाम कुठे तरी भाजपवर व धनगर समाजाच्या नाराजीवर होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली पाहिजे, अशा आशयाच्या सूचना जिल्ह्यातील भाजपच्या ‘ब्रेन’कडून केल्या गेल्याचे समजते.

मंत्रिपद हवंय; लागा कामाला
भाजप सरकारमध्ये मंत्रिपदाची अपेक्षा आमदार शिवाजीराव नाईक आणि सुरेश खाडे यांना आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला किती उमेदवार निवडून येतात, त्यावर ‘मेरिट’ ठरणार आहे. खाडे यांचे राजकारण आजवर स्वयंकेंद्रित राहिले आहे. त्यांना स्पष्ट शब्दांत सूचना देण्यात आल्या आहेत; शिवाय नाईक यांना या वेळी ताकद दाखवावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com