भाजप आमदार कोल्हे यांचा 'फेक' राजीनामा व्हायरल ; राजीनामा न दिल्याचे स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तरी "आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोणालाही राजीनामा पाठविला नाही, असा खुलासा त्यांचे पती व संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी "सकाळ'शी बोलताना केला. 

नगर : मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात आमदारांचे राजीनामा सत्र सुरू असतानाच आज रात्री नऊ वाजता कोपरगावच्या भाजप आमदार स्नेहलता कोल्हे यांचा फेक राजीनामा सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे भाजपासह जिल्ह्यात उलटसुलट चर्चेला सुरवात झाली. 

राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाची धग गावोगावच्या गल्ली बोळात तर, शहराच्या कॉलनीत पोहोचली आहे. राज्यभर जाळपोळ तोडफोड सुरू आहे. संतप्त मराठा बांधवांनी मराठा खासदार आणि आमदार यांनी पदाचे राजीनामे द्यावे, अशी मागणी केली. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आमदार भारत भालके, तसेच महिला आमदार सीमा हिरे यांनी मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन पदाचे राजीनामे दिले. 

दरम्यान, आज रात्री नऊ वाजता कोपरगाव मतदारसंघाच्या भाजप आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या लेटरहेडवर आपण मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनास पाठिंबा देत असून, त्यासाठी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे नमूद करीत राजीनामा दिल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले.

याबाबत आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तरी "आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोणालाही राजीनामा पाठविला नाही, असा खुलासा त्यांचे पती व संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी "सकाळ'शी बोलताना केला. 

Web Title: BJP MLA Kolhe Fake resigns viral Explanation for not giving resignation