जवानांबाबत भाजप सहयोगी आमदाराचे बेताल वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

पंजाबमधील सीमेवर लढत असलेला जवान वर्षभर तिकडे असतो. त्याला इकडे मुलगा झाल्याचे तार करून कळविले जाते. मग तो तिकडे पेढे वाटून आनंद साजरा करतो. असे कसे काय होते

पंढरपूर - आमदार प्रशांत परिचारक यांनी देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या पत्नींच्या चारित्र्या संदर्भात निवडणूक प्रचार सभेत बेताल वक्तव्य केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. भोसे (ता.पंढरपूर) येथील सभेत त्यांनी सैनिकांच्या संदर्भात अवमानकारक आणि हिन पातळीवरील उदाहरण दिल्याने त्यांच्या या वक्तव्याचा निषेध होत आहे. दरम्यान आज सकाळी परिचारक यांनी पत्रकारांशी बोलताना झालेल्या प्रकाराविषयी जाहीर माफी मागितली. 

पंढरपूर तालुक्यातील भोसेमधल्या भाजप उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना परिचारक यांनी राजकारणाची व्याख्या करताना देशाच्या जवानांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची फुटलेली मते मिळवून ते सोलापूरमधून विधान परिषदेवर निवडून गेले होते.

आमदार परिचारक यांच्याकडून राजकारण सध्या कशा पध्दतीने चालू आहे याचे उदहारण सांगताना जवानांविषयी वक्तव्य केले. ते म्हणाले, "पंजाब मधला सैनिक असतो सीमेवर आणि त्याची बायको इकडे बाळंतीण होते. तुम्हाला मुलगा झाला अशी त्याला तार येते. वर्षभर तो गावाकडे गेलेला नसतो आणि तिथे तो पेढे वाटतो. लोक म्हणतात, काय झालं तो सांगतो मला मुलगा झाला. असे सगळे राजकारण आहे." 

दरम्यान परिचारक यांना त्यांच्या अक्षम्य वक्तव्याची जाणीव झाली. त्यांनी आज सकाळी त्यांच्या वक्तव्या विषयी पत्रकारांच्या समोर जाहीर माफी मागितली. ते म्हणाले, गेली अनेक वर्षे समाज आमच्या कुटुंबाला ओळखतो. देशाच्या सीमेवीर देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्याची भूमिका आम्ही आजवर घेतलेली आहे. तथापी भाषणाच्या ओघात आपल्याकडून चूकीचे वक्तव्य केले गेले. तसे माझ्या कडून घडायला नको होते परंतु आपल्या कडून झालेल्या वक्तव्या संदर्भात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांची मी जाहीर दिलगीरी व्यक्त करतो. माफी मागतो. भविष्य काळात माझ्याकडून सैनिक आणि त्यांचे कुटुंबिय तसेच महिलांच्या बद्दल त्यांच्या भावना दुुखावतील असे वक्तव्य कधीही होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: BJP MLA Prashant paricharak insult Jawan

व्हिडीओ गॅलरी