भाजप खासदार संजयकाका पाटील यांची वेगळी चूल अन्‌ पक्षांतराची हूल 

अजित झळके
Wednesday, 28 October 2020

संजयकाका​ कुठल्याही पक्षात असोत, त्यांचे सर्वपक्षिय संबंध नेहमीच चर्चेत राहिले आहेत. ते साऱ्यांच्या खांद्यावर हात टाकून असतात. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराची चर्चा नवी नाही.

सांगली ः भाजपचे सांगली लोकसभा मतदार संघाचे खासदार संजयकाका पाटील यांच्या पक्षांतराबद्दल पुन्हा एकदा हूल उठवली गेली आहे. खासदार पाटील यांनी हा आपल्या विरोधकांचा नेहमीचा कार्यक्रम असल्याचे सांगत शक्‍यता फेटाळून लावली आहे. संजयकाका कुठल्याही पक्षात असोत, त्यांची चूल वेगळी असते किंवा ती पक्षातील इतर नेत्यांना तशी दिसते... भाजपमध्येही सध्या त्यांचे तसेच सुरु आहे. 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नुकताच सांगली जिल्हा दौरा केला. त्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आटपाडी, खानापूर, तासगाव, जत आणि मिरज तालुक्‍यात ते फिरले. या दौऱ्याचे नियोजन करण्यात आमदार गोपीचंद पडळकर पुढे होते. सहाजिकच, गोपीचंद हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहेत आणि दरेकरही. त्यामुळे पडळकर-दरेकर यांचे जमते. त्यात अडचण अशी की सांगली जिल्ह्यात खासदार पाटील आणि पडळकर यांच्यात विस्तव जात नाही. एकमेकांना बघून घेण्यापासून इथे पाय ठेवून दाखवापर्यंत या दोन्ही गटांकडून धमक्‍या दिल्या गेल्या होत्या. लोकसभेला हे दोघे एकमेकांच्या विरोधात लढले होते. आता एका पक्षात आल्यानंतरही त्यांचे मिटलेले नाही, अर्थात पुन्हा उघड संघर्ष दिसला नसला तरी धुसफूस संपलेली नाही, हे अनेक प्रसंगातून स्पष्ट झाले आहे. दरेकर यांच्या दौऱ्याकडे खासदार पाटील यांनी पाठ फिरवली, अर्थात ते त्यावेळी बाहेरगावी होते, मात्र व्हायची ती चर्चा झालीच. त्यांच्या भूमिकांची टोकदार समीक्षा करणाऱ्यांनी त्यांच्या राष्ट्रवादी जवळीकीची दाखला देत पक्षांतराची चर्चा उठवली. 

सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच जोरात विरोध झाला होता. तो कसातरी मिटवून त्यांना उमेदवारी दिली गेली आणि ते पुन्हा दीड लाखाच्या मताधिक्‍याने विजयी झाले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत संजयकाकांच्या कामावरून शंका कुशंका घेतल्या गेल्या. ते प्रकरण शांत होत असतानाच आता नव्याने चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा होण्यामागे काही ताजी कारणेही दिली जात आहेत. तासगाव सहकारी साखर कारखाना एकदा वादातून बाहेर पडत खासदार पाटील यांच्या गणपती संघाच्या मालकीचा झाला आहे. त्यात राज्य सरकारने मदत केली की नाही, हा पुन्हा वादाचा मुद्दा, पण संजयकाकांचे घोडे गंगेत न्हाले एकदाचे. त्यांनी जिल्हा बॅंकेकडून विकत घेतलेला आणि न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला यशवंत कारखाना यंदा चालू केला जाणार आहे. हे सारे घडत असताना संजयकाकांची राष्ट्रवादी कॉंग्रेसशी जवळीक आहे का, अशी चर्चा रंगली. संजयकाका आधी कॉंग्रेसमध्ये होते, तेथून ते राष्ट्रवादीत गेले आणि 2014 ला भाजपच्या लाटेवर स्वार होत खासदार झाले. ते कुठल्याही पक्षात असोत, त्यांचे सर्वपक्षिय संबंध नेहमीच चर्चेत राहिले आहेत. ते साऱ्यांच्या खांद्यावर हात टाकून असतात. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराची चर्चा नवी नाही. यावेळी त्यांनी ती फेटाळून लावली आहे. या घडीला पक्षांतर करायला कारणच नाही, हे उघड आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Sanjaykaka Patil's different hooliganism