भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचा अंडरस्टॅंडिगचा खेळ; फक्त गुडेवारांशी चुकला मेळ

अजित झळके
Friday, 10 July 2020

सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा सांगली जिल्हा परिषदेत अंडरस्टॅंडिंगने खेळ सुरु आहे.

सांगली ः सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा जिल्हा परिषदेत अंडरस्टॅंडिंगने खेळ सुरु आहे. कुठल्याही प्रकरणात कुणी कुणाची चूक काढायची नाही, काढलीच तर "तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो', यावर मिटवायचे, असा पॅटर्न गेल्या तीन वर्षात मुरला आहे.

या खेळात मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्याशी मेळ चुकल्याने थोडी खळखळ सुरु झाली आहे. अन्यथा, इथे सारा "भाऊ'बंदकीचा कारभार आहे. सर्वच पक्षातील "भाऊ' एकमेकांना सांभाळून घेत आहेत. अपवाद वगळता सर्वच आमदारांना कडक अधिकारी नको असतो, येथेही तशीच चर्चा आहे. पण नाव फक्‍त एक-दोघांचेच पुढे आले एवढेच! 

जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिले अध्यक्ष म्हणून संग्रामसिंह देशमुख या "भाऊ'नी कारभार हाती घेतला. मुख्य विरोधी पक्ष राष्ट्रवादी. त्याचे नेतृत्व आले शरद लाड या "भाऊं'कडे. संग्रामभाऊ आणि शरदभाऊ दोघे जीवलग मित्र. त्यामुळे शरदभाऊंनी संग्रामभाऊंचे "लाड'च जास्त केले. त्यात कॉंग्रेसचे अभ्यासू सदस्य आणि नेते म्हणून सत्यजीत देशमुख हेही "भाऊ' आणि जितेंद्र पाटील हेही "भाऊ'च. त्यामुळे या काळात कितीही पाणी मुरले तरी त्याचा आवाज बाहेर पडला नाही.

अगदी एका पक्षात राहून संग्रामभाऊंशी अंतर राखून असलेले सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांचा "कडकनाथ कोंबडी खरेदीसाठी राखून ठेवलेल्या रकमेचे झाले काय?' या प्रश्‍नाचा आवाज फार वाढू दिला नाही. या रकमेतून खुल्या गटासाठी अकरा घरकुले बांधली गेली. त्यातील आठ घरकुले एका कडेगाव तालुक्‍यात नेली. हा "भाऊं'चा कारभार चुकीचा असल्याची झोड ना कॉंग्रेसने उठवली, ना राष्ट्रवादीने. आता जिल्हा परिषदेत प्राजक्ता कोरे अध्यक्ष आहेत. त्यांचे पतीदेव नंदू हे छोटे "भाऊ' तर दीर राजू कोरे हे "मोठे भाऊ' कारभार पाहतात, असे चित्र आहे. त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी 49 लाख रुपयांचा स्विय निधी सदस्यांना विश्‍वासात न घेता पळवला. त्यावर एकमेव जितेंद्रभाऊंनी आवाज उठवला, मात्र त्याला कुणी साथ दिली नाही. काहींनी तर "संग्रामभाऊंचे दडपले, मग कोरेभाऊंचे का उकरताय', असा सवाल करत "अल्पसंख्याक कार्ड' पुढे करण्याचा प्रयत्न केला. 

अभिजित राऊत मुख्य कार्यकारी अधिकारी असताना हा कारभार शांतपणे सुरु होता. ठेकेदारच ठरवत होते कुठले काम कुणी घ्यायचे. सारा अंडरस्टॅंडिगचा खेळ सुरु होता. भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या फायली पुढे सरकत नव्हत्या. अनेक नेत्यांचे लाकडे ठेकेदार लाखोंचा अपहार करून दिमाखात सरकारी नोकरीही करत होते आणि बोगस पदोन्नतीही घेत होते. ग्रामसेवकांनी हाप मर्डर केला तरी कारवाई होत नव्हती. श्री. राऊत शांत होते की त्यांनी शांत रहावे म्हणून राजकीय दबाव होता, हा वेगळा संशोधनाचा विषय, मात्र राऊत यांच्या संयमीत भूमिकेचा गैरफायदा उचलण्याची एक संधी इथल्या व्यवस्थेने सोडली नाही. श्री. राऊत यांच्या बदलीनंतर चंद्रकांत गुडेवार सीईओ झाले आणि या खेळाचा मेळ चुकायला लागला. गुडेवार यांनी जुन्या फायली उकरल्या, सही केल्या आणि निलंबन, बडतर्फी, फौजदारीचा धडाका लावला आहे. एकाची "जेल वारी' झाली आहे. त्यांनी कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी पूर्ण झालेली कामे गावाला दान करून टाकली. कामांचे ठेके सदस्यांची शिफारस न घेता दिले. पदोन्नतीच्या नेमणुका समुपदेशनाने केल्या. हे सारे खटकल्यानंतर सदस्य अस्वस्थ झाले. पक्ष वेगळे, मात्र साऱ्यांच्या भूमिका जवळपास एकच आहेत काय, अशी शंका यायला इथे वाव आहे. 

"गुडेवार हटाव'ची मोहिम सुरु झाल्यावर काहींनी पाठींबा दिला तर काही शांत बसले. कॉंग्रेस, राष्ट्रवादीने त्याला विरोध करायला दूरच, त्या सूरात सूर मिसळला. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी गुडेवारांच्या बदलीसाठी पत्रे दिल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी केला आहे. त्यात तथ्य असल्याची खात्रीशीर माहिती आहे. गुडेवार कायद्याने वागतात म्हणून जड झाले की भाऊबंदकीच्या "मिले सूर मेरा तुम्हारा'त त्यांनी खोडा घातला म्हणून ते नकोसे झाले, याचे उत्तर विरोध करणारेच देतील. इथेही भाऊबंदकी आहे, हे विशेष. कारण, गुडेवारांच्या विरोधात पत्र लिहणारे आमदार सुरेश खाडे हेही "भाऊ'च आणि "गुडेवार चांगले काम करत आहेत म्हणून बदलीची मागणी करू का?' असे विचारणारे आमदार अनिल बाबर हेही भाऊच. 

एलईडी घोटाळा गेला कुठे? 

जिल्हा परिषद यंत्रणेतील अलिकडच्या काळातील सर्वात मोठा घोटाळा म्हणून एलईडी खरेदी घोटाळ्याची चर्चा झाली. "सकाळ'ने तो उजेडात आणला. त्याचे पुढे काय झाले? त्याच्या चौकशा कशा गुंडाळल्या याची अनेक उदाहरणे देता येतील. एलईडी खरेदीसाठी दोन-तीन कोटेशन जोडली आणि त्यातील सर्वात कमी रकमेचे मंजूर केले म्हणजे पारदर्शी कारभार झाला, अशी "क्‍लीन चीट' दिली गेलीय. पण, हे तीन कोटेशन बनावट होते की खरे, याची चौकशी झालीच नाही. सर्व पक्षातील ग्रामपंचायतींमध्ये हा घोटाळा झाल्याने तो दडपला गेलाय. इथेही भाऊबंदकी आहेच.  

संपादन - युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP, NCP, Congress's game of understanding in Sangali ZP