खादाड कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळेच भाजप सत्तेत- ओवेसी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016


मराठा आरक्षणाला विरोध नाही : ओवेसी
मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रातील मुस्लिमांनाही मी रस्त्यावर आणू शकतो. मात्र हे करणार नाही. आम्हाला आरक्षण हवे आहे, असे श्री. ओवेसी म्हणाले.

इस्लामपूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीने पंधरा वर्षांत पोट फुगेपर्यंत खाल्ले. त्यामुळे भाजप-शिवसेनेचे सरकार आले. त्याचे परिणाम जनता भोगत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे लाल दिवे गेले; पण भाजपकडे सत्ता आल्याने गरिबांना मनस्ताप होत आहे, अशी टीका "एमआयएम'चे संस्थापक खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज येथे केली.

ते म्हणाले, ""नरेंद्र मोदींच्या नोटाबंदी निर्णयामुळे देश दरिद्री बनला. या निर्णयामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास होत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह भाजप व मोदी समर्थकांनी बॅंका व एटीएमच्या रांगेत येऊन पाहावे. त्रास का तो त्यांना कळेल.''
पालिका निवडणुकीतील "एमआयएम'च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. आमदार वारीस पठाण, आमदार इम्तियाज जलील, अंजुम इनामदार, प्रदेशाध्यक्ष सईद मोमीन, जिल्हाध्यक्ष व नगराध्यक्षपदाचे उमेदवार शाकीर तांबोळी उपस्थित होते.

ते म्हणाले, ""आमच्या असहाय्यतेमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे फावले. वाघ येईल अशी भीती दाखवून कॉंग्रेसने सत्तर वर्षे मुस्लिमांची ताकद वापरली. आता आम्ही कशालाच घाबरत नाही.''
"एमआयएम'चा फायदा भाजपप्रणीत विकास आघाडीला होईल, या आमदार जयंत पाटील यांच्या विधानाचा समाचार घेत श्री. ओवेसी म्हणाले, ""आमचा फायदा अन्य कोणत्याही पक्षाला नाही तर गरीब, दलित व मुस्लिमांना होईल. नोटाबंदीमुळे बॅंका, एटीएमसमोरील रांगा आहेत. त्यात गरीब, सामान्य आहेत. निर्णय घेणारे दिल्लीत आरामात गंमत पाहत आहेत. 50 दिवसांत प्रश्न सुटणार नाही. अर्थव्यवस्थेसमोर गंभीर आव्हान आहे.
ते म्हणाले, ""शरद पवार यांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले. आता त्यांच्या आमदारांनी बॅंका व एटीएमच्या रांगेत उभे राहिलेल्या लोकांसमोर जावे म्हणजे जनतेचा राग कळेल. मीडियावर मोदी भजन सुरू आहे. त्यांनीही बाहेर पडावे म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा मेकअप उतरेल.''
आमदार पठाण म्हणाले, ""भाजपने देश, राज्याची वाईट अवस्था केली. कॉंग्रेस व राष्ट्रवादीने चांगले काम केले असते तर ही वेळ आली नसती. हक्‍काची लढाई सुरू आहे. मागून मिळाले नाही तर हिसकावून घेऊ.''
शाकीर तांबोळी म्हणाले, ""इस्लामपुरातील सामान्यांच्या प्रश्नांबाबत सत्ताधारी व विरोधक दोघेही उदासीन आहेत. त्यांना हद्दपार करा.''
प्रदेशाध्यक्ष सईद मोईन यांचे भाषण झाले. श्री. ओवेसी यांच्या सभेला शहर व जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री नऊ वाजेपर्यंत श्रोते वाट पाहत होते. "देखो देखो, कौन आया, शेर आया शेर आया' अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.

मोदी पंतप्रधान नव्हेत ऍक्‍टर
नरेंद्र मोदींच्या वेगवेगळ्या भाषणांचे संदर्भ देऊन ओवेसींनी त्यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, ""मोदी मुंबईत एक बोलतात, गोव्यात भावनिक होतात आणि उत्तर प्रदेशात वेगळेच बोलतात. ते देशाचे पंतप्रधान आहेत, की कॉमेडी शोमधील ऍक्‍टर आहेत, हेच समजत नाही.''

मराठा आरक्षणाला विरोध नाही : ओवेसी
मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रातील मुस्लिमांनाही मी रस्त्यावर आणू शकतो. मात्र हे करणार नाही. आम्हाला आरक्षण हवे आहे, असे श्री. ओवेसी म्हणाले.

उत्साह 27 ला दाखवा
ओवेसींच्या आगमनापासून फटाक्‍यांची आतषबाजी व घोषणाबाजी सुरू होती. त्यांच्या भाषणादरम्यान उत्साही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यांना थांबवत ते म्हणाले, ""हा उत्साह व गर्मी 27 तारखेला मतदानावेळी दाखवा. "एमआयएम'चे हात बळकट करा. ही वनडे मॅच आहे. कसोटीसारखे टुकूटुकू खेळू नका.''

Web Title: bjp in power due to corrupt congress, ncp