भाजपच्या मुसंडीमुळे चौरंगी लढती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

सातारा - जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 805 उमेदवारांनी मैदानातून माघार घेतली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या 64 जागांसाठी 287, तर पंचायत समित्यांच्या 128 जागांसाठी 530 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. नेहमी दोन्ही कॉंग्रेसभोवती फिरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या वेळी भाजपने मुसंडी मारल्यामुळे बहुतांश तालुक्‍यांत चौरंगी लढती होत आहेत. इच्छुकांची संख्या अधिक असूनही खंडाळा तालुका वगळता उर्वरित ठिकाणी बंडाळी थोपविण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरली आहे. अर्ज न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने कालगाव, कोंडवे, तासगाव, पळशी गणांचा निर्णय बुधवारी (ता.

सातारा - जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 805 उमेदवारांनी मैदानातून माघार घेतली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या 64 जागांसाठी 287, तर पंचायत समित्यांच्या 128 जागांसाठी 530 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. नेहमी दोन्ही कॉंग्रेसभोवती फिरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या वेळी भाजपने मुसंडी मारल्यामुळे बहुतांश तालुक्‍यांत चौरंगी लढती होत आहेत. इच्छुकांची संख्या अधिक असूनही खंडाळा तालुका वगळता उर्वरित ठिकाणी बंडाळी थोपविण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरली आहे. अर्ज न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने कालगाव, कोंडवे, तासगाव, पळशी गणांचा निर्णय बुधवारी (ता. 15) होणार आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी सर्वच तालुक्‍यांत नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. काही गट, गणांत पक्षाच्या बंडखोरांसह काही आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना आश्‍चर्यकाररीत्या उमेदवारी मागे घेणे भाग पडले. 

जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भाजप, शिवसेना या राजकीय पक्षांनी अपवादात्मक परिस्थिती वगळता स्वबळावर उमेदवार उभे केल्याने जिल्हाभरात बहुतांश जागांवर चौरंगी लढती होत आहेत. खुल्या गटांत उमेदवारांची संख्या अधिक असल्याने तेथे चुरशीच्या लढती होणार आहेत. अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट झाल्याने आता आठवडाभर प्रचाराचा धुरळा उडणार आहे. 

तालुकानिहाय गट व गणनिहाय (कंसात) उमेदवारांची संख्या ः सातारा 40 (68), वाई 13 (34), खंडाळा 20 (31), महाबळेश्‍वर 5(10), कोरेगाव 22 (36), जावळी 12 (26), कऱ्हाड 57 (108), फलटण 33 (54), खटाव 27 (53), माण 24 (41), पाटण 34 (69). 

तालुकानिहाय अर्ज माघारी संख्या : सातारा : 104, कोरेगाव : 67, जावळी 58, वाई : 13, महाबळेश्‍वर : दहा, खंडाळा : 41, कऱ्हाड : 221, पाटण 62, माण : 60, खटाव : 63, फलटण : 106. 

या मातब्बरांची माघार 

शेंद्रे गट ः सुनील काटकर (सातारा विकास आघाडी), तळदेव गट ः अर्चना शेटे (शिवसेना), पिंपोडे गट ः लालासाहेब शिंदे, किन्हई गण ः तुकाराम वाघ (कॉंग्रेस), बिदाल गट ः मोहन बनकर (राष्ट्रवादी) व बाबासाहेब वीरकर (राष्ट्रीय समाज पक्ष), यशवंतनगर गण ः अलका गायकवाड (कॉंग्रेस), खटाव गट ः चंद्रकांत पाटोळे (कॉंग्रेस), वारुंजी गण ः पांडुरंग चव्हाण (राष्ट्रवादी), कोळे गण ः राजेंद्र चव्हाण (कॉंग्रेस), खेड बुद्रुक गण ः बापूराव धायगुडे व अजय धायगुडे (कॉंग्रेस). 
साखरवाडी गट ः अशोक सस्ते (राष्ट्रवादी), गिरवी गट ः जगदीश कदम (कॉंग्रेस), विडणी गट ः विजयमाला शेंडे (रासप), कोळकी गट ः हनुमंत सोनवलकर (राष्ट्रवादी), हिंगणगाव गट ः खंडेराव सरक (रासप).

Web Title: bjp in satara