कोल्हापूर मनपा : आंदोलनाच्या निमित्ताने भाजपचे मिशन 2020

डॅनियल काळे
शनिवार, 20 जुलै 2019

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीबरोबरच कोल्हापूर महापालिका निवडुकीतही भाजपचीच सत्ता आणण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी आदेश दिल्याने कार्यकर्ते चांगलेच कामाला लागले आहेत. शहरातील भाजपने पंधरा दिवसात विविध आंदोलने करून शहरातील महत्त्वाचे विषय हाती घेण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर महापलिका मिशन २०२० यशस्वी करण्यासाठीची व्यूहरचना भारतीय जनता पक्षाने आत्तापासून आखली आहे.

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीबरोबरच कोल्हापूर महापालिका निवडुकीतही भाजपचीच सत्ता आणण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी आदेश दिल्याने कार्यकर्ते चांगलेच कामाला लागले आहेत. शहरातील भाजपने पंधरा दिवसात विविध आंदोलने करून शहरातील महत्त्वाचे विषय हाती घेण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर महापलिका मिशन २०२० यशस्वी करण्यासाठीची व्यूहरचना भारतीय जनता पक्षाने आत्तापासून आखली आहे.

पंधरा दिवसापूर्वी भाजप महानगरजिल्हाध्यक्षपदी नव्याने नियुक्ती करण्यात आली. राहुल चिकोडे यांना अध्यक्ष केले. तसेच उर्वरित कार्यकारिणीही ॲक्‍टीव्ह करण्याचा आदेश पक्षनेतृत्वाने दिल्याने कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. दोन महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी आता सुरू आहेच; पण एक वर्ष पुढे असणाऱ्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचीही जय्यत तयारी भाजपने करायला सुरवात केली आहे. प्रत्येक विभागातले प्रश्‍न सोडविण्याच्या सूचना भाजपने केल्या आहेत.

जे प्रश्‍न शासन स्तरावर सोडवायचे आहेत ते पक्षाने स्वता सोडविण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना कार्यरत राहण्याच्या सूचना दिल्याच आहेत; पण जे प्रश्‍न शहर पातळीवर महापालिकेकडे प्रलंबित आहेत ते आंदोलनाच्या माध्यमातून महापलिका प्रशासनाकडून सोडवून घेण्यासाठी आंदोलनही करायला कमी पडू नका, असा आदेशच पक्षाने दिल्याने कार्यकर्तेही त्या दिशेने आता प्रवास करत आहेत.

चिकोडे यांची नेमणूक होताच काही दिवसानंतरच कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनने पाणी देण्याच्या योजनेसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. या योजनेतील त्रुटीसंदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यानी आयुक्त कलशेट्टी यांच्याकडे चर्चा केली. विशेषत: या विषयातील एक अभ्यासक ॲड. बाबा इंदुलकर यांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना विचारलेल्या प्रश्‍नांची ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. ठेकेदार बिल स्वीकारताना ते आपल्याला मान्य नाही, असा शेरा मारुनच स्वीकारतो. त्यामुळे भविष्यत या योजनेची किंत वाढण्याचा धोका आहे, हे आंदोलकांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी जलअभियंता कुलकर्णी यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. 

या आंदोलनाने भाजपचे कार्यकर्ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्याचबरोबर दोनच दिवसापूर्वी राजारामपुरी जनता बझारजवळ कार्यकर्त्यांनी आंदोलन करून विहीर स्वच्छ करण्याची मागणी केली. ही विहीर स्वछ करण्याची मोहीम दुसऱ्या दिवशीपासून महापालिकेने सुरू केली आहे; मात्र त्यामध्ये अनेक तांत्रिक बाबी पुढे येत आहेत. सफाई कर्मचाऱ्यांमार्फत हा गाळ काढणे अशक्‍य असल्याने यासंदर्भात निविदा काढून हा गाळ काढून विहीर स्वछ करता येईल का? याबाबतीत महापालिका आता विचार करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP starts Kolhapur corporation Mission 2020