सौर उर्जेने शेतीचे अर्थकारण बदलेल - चंद्रकांत पाटील

सौर उर्जेने शेतीचे अर्थकारण बदलेल - चंद्रकांत पाटील

गडहिंग्लज - सौर उर्जेच्या वापराद्वारे शासनाने क्रांतीकारक विचारांची सुरूवात केली आहे. सौर उर्जेमुळे शेतकऱ्यांना आठ महिने स्वस्त व दिवसा वीज मिळणार आहे. येत्या काही वर्षात राज्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना सौर वीज देण्याचे धोरण असून त्याद्वारे शेतीचे आणि उद्योगांचेही अर्थकारण बदलेल, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.

वीज महावितरण आणि ईईएसएल कंपनीतर्फे उभारलेल्या गडहिंग्लजमधील मुख्यमंत्री कृषी वीज वाहिनी सौर उर्जा प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, नगराध्यक्षा स्वाती कोरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. पाटील म्हणाले, ""समतोल ऋतूमान असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. आतापर्यंत आपण सूर्यप्रकाश वाया घालवायचो. सूर्यप्रकाशचा वापर वीजेसाठी करावा लागेल या विचाराने शासनाने हे क्रांतीकारी पाऊल उचलले. कोळसा, पाणी, नाफ्ता, अणूपासूनच्या वीजनिर्मितीपेक्षा सौर उर्जा कितीतरी पटीने स्वस्त आणि पर्यावरणासाठी अनुकूल आहे. सौर वगळता वीज निर्मितीच्या इतर स्त्रोतामुळे हवेत मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्‍साईड उत्सर्जन होतो. याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. सौर उर्जेने कोणतेही प्रदूषण होणार नाही. उलट ही वीज स्वस्त असेल. आता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वीजेच्या किमतीत शासनाकडून सबसीडीपोटी बारा हजार कोटी दिले जातात. या सबसीडीचा बोजा उद्योगांच्या वीजबिलापोटी येणाऱ्या महसूलातून सांभाळला जातो. म्हणजेच शेतकऱ्यांचा तोटा उद्योगातून भरून काढला जातो. परिणामी वीज परवडत नसल्याने इंडस्ट्रिही आज मोडकळीस येत आहेत. आता शेतकऱ्यांनाच स्वस्त दराने सौर उर्जा मिळाल्यास शासनाचा सबसीडीपोटीचा खर्च कमी होईल, पर्यायाने इंडस्ट्रिवरही जादा दराचा बोजा पडणार नाही." 

महावितरणचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी प्रास्ताविक केले. मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते सौर उर्जा प्रकल्पाचे उद्‌घाटन झाले. यावेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे, प्रकाश चव्हाण, रमेश रेडेकर, गोपाळराव पाटील, भरमू पाटील, बाबा देसाई, अधीक्षक अभियंता सागर मारूलकर, कार्यकारी अभियंता सुरेंद्रनाथ भोये, ईईएसएलचे अनिल दाभाडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. पोवार, सरपंच विलासमती शेरवी, नम्रता पाटील आदी उपस्थित होते.

ट्रॅक्‍टरद्वारे व्यवसाय
श्री. पाटील म्हणाले, ""सौर उर्जेचा हळूहळू विस्तार वाढणार आहे. भविष्यात एखादा तरूण शेतकरी ट्रॅक्‍टरवर सौर पॅनेल बसवून ताशी भाडेतत्वावर गरजू शेतकऱ्यांचा कृषीपंप सौर उर्जेद्वारे चालू करून देवू शकतो. शिवाय ही वीज स्वस्त असल्याने शेतकऱ्यांनाही ते बरे पडेल. तरूणवर्ग हा व्यवसाय करू शकेल. एमएसईबीपेक्षा स्वस्त दरात वीज मिळाल्याने छोट्या शेतऱ्यांना ते फायदेशीर ठरेल."" 

सरकारी कार्यालये सौर उर्जेवर
राज्यातील संपूर्ण सरकारी कार्यालये सौर उर्जेवर आणण्यासाठी शासनाने ईईएसएलशी करार केला आहे. याशिवाय मुंबईत सौर बॅटरीवर शासनाचे चार मोटारीही सुरू आहेत. ही संख्या वाढवण्यासाठी मुंबईतील पीडब्ल्यूडीच्या खुल्या जागा सौर उर्जेच्या चार्जींग सेंटरसाठी ईईएसएलकडे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मार्च 2020 पर्यंतच्या 4382 प्रलंबित कृषी पंप कनेक्‍शन देण्याची मोहिम सुरू होणार आहे. खराब पोल, वीज वाहिन्यांसाठीही डिसेंबरपर्यंत निधी देवू, अशी ग्वाही श्री. पाटील यांनी दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com