आयात नेत्यांवर सांगलीत भाजप बलाढ्य

अजित झळके
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उसन्या ताकदीवर रुजलेला भाजप आज बलाढ्य झाला आहे. विधानसभेला २००९ पासून इथे पक्षाची कामगिरी चांगली राहिली. २०१४ ला निम्म्या जागा जिंकून भाजपने मुसंडी मारली. तोवर या पक्षाशी सुरक्षित अंतर ठेवून असलेल्यांनी पटापट उड्या घेतल्या आणि भाजपने जहाज गच्च भरले. इतके की पक्षातील निष्ठावंतांची अवस्था अडगळीत पडल्यासारखी झाली.

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उसन्या ताकदीवर रुजलेला भाजप आज बलाढ्य झाला आहे. विधानसभेला २००९ पासून इथे पक्षाची कामगिरी चांगली राहिली. २०१४ ला निम्म्या जागा जिंकून भाजपने मुसंडी मारली. तोवर या पक्षाशी सुरक्षित अंतर ठेवून असलेल्यांनी पटापट उड्या घेतल्या आणि भाजपने जहाज गच्च भरले. इतके की पक्षातील निष्ठावंतांची अवस्था अडगळीत पडल्यासारखी झाली.

जागा कमी आणि गर्दी जास्त झाल्याने कोपरखळ्या लागू लागल्यात. देश, राज्यातील सत्ता, अमर्याद ताकद,  स्वप्नवत विस्तार याबरोबर येणारे कुरबुरीचे दुखणेही येथे जडले. त्यावर मात करण्याची कला राज्यातील शीर्ष नेतृत्वाकडे आहे, ती लोकसभेला दिसली, मात्र निष्ठावंतांची खदखद दूर करायची बाकी आहे. त्यावर मात करून विधानसभेला किमान सहा जागा जिंकण्याचे लक्ष भाजपने ठेवले आहे. 

विधानसभा निवडणुकीत कमळ फुलणं नवं नव्हतं, पण वसंतदादांची सांगली इंदिरा गांधी पराभूत झाल्या तेव्हाही हालली नव्हती. तो बालेकिल्ला  नेस्तनाबूत करून दादांच्या सांगलीत कमळ फुलवण्याची किमया २०१४  मध्ये झाली. संजयकाका पाटील खासदार झाले. तो भाजपला खरा बुस्टर होता. त्याआधी भाजपपासून दोन हात दूर राहण्याची भूमिका घेणाऱ्यांनी तंबू बदलायला सुरवात केली. राष्ट्रवादी रिकामीच झाली. डाव्या-उजव्या भिंती पार कोसळून गेल्या. त्याआधी सांगली, मिरज मतदार संघात राष्ट्रवादीच्या मदतीवर पोसलेल्या पक्षाने त्यानंतर मात्र मागे वळून पाहिले नाही.

पश्‍चिम महाराष्ट्रात शेतकरी चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या स्वाभिमानी संघनटनेला सुरुंग लावत सदाभाऊंसारखा मोहरा गळाला लावला. पृथ्वीराज देशमुखांना विधान परिषद, इतरांना महामंडळांवर संधी दिली. इथली जेजीपी शंभर टक्के बीजेपी करून दाखवली. 

विधानसभेला चार आमदार आले. जिल्हा परिषद जिंकली. पंचायत समित्या, ग्रामपंचायत, विकास सोसाट्यांवरही झेंडा लावला. महापालिकेवर एकहाती सत्ता आणून त्यावर सोनेरी कळस चढवला. काँग्रेस, राष्ट्रवादीचे ग्रामीण भागातील केडर उद्‌ध्वस्त करून आपल्याकडे खेचले आणि शहरी मतदारांसह ग्रामीण भागातही भाजपचा वरचष्मा निर्माण केला. ज्या पक्षाची उमेदवारी घ्यायला लोक मिळायचे नाहीत तेथे रांगा लावून मुलाखती दिल्या जाताहेत. आता भाजप इतका बलाढ्य आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला स्वबळावर तोंड देण्याची पक्षाची तयारी आहे. 

जिल्ह्याने भाजपला भरभरून दिले. जिल्हा बॅंक वगळता स्थानिक संस्थांत वरचष्मा निर्माण केला. भाजपने मात्र मंत्रिपदात जिल्ह्यावर अन्याय केल्याची भावना चार वर्षे राहिली. शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे यांना सतत वेटिंग लिस्टरवर रहावे लागले. शेवटच्या टप्प्यात खाडे मंत्री झाले, मात्र पाच वर्षे जिल्ह्याने उसन्या पालकमंत्र्यांवर काढली. त्याचा फटका बसला. सदाभाऊंनी इस्लामपूर सोडून सांगलीत लक्ष घालू नये, याची व्यवस्था काँग्रेस अंगात मुरलेल्या नव्या भाजप नेत्यांनी केली. या पाच वर्षांत निष्ठावंतांतून नाराजीचा सूर सतत कानी येत राहिला. त्यांनी आयुष्यभर सतरंज्या वाहिल्या, मात्र  सत्तेच्या सुकाळात झोळी रिकामीच. ती भावना प्रबळ आहे. नीता केळकर, मकरंद देशपांडे, दिपक शिंदे असे प्रवाहातील चेहरे प्रतीक्षेत आहेत. केळकर यांनी सांगलीतून उमेदवारीची आग्रही मागणी केली आहे. 

भाजपने गेल्या पाच वर्षांत काही महत्त्वाकांक्षी निर्णय घेत जिल्ह्याला विकासवाटेवर आणले. ते पक्षाचे बलस्थानच आहे. तीन राष्ट्रीय महामार्गांचे जाळे जिल्ह्यात विणले जात आहे. म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सुधारित प्रस्तावाला मान्यता आणि सोबत निधी दिला आहे. सांगली शहरात एक रेल्वे उड्डाणपूल, कृष्णा नदीवर दोन पूल मंजूर आहेत. ड्रायपोर्ट आणि सौरशेतीचा प्रस्ताव तेवढा लटकला आहे. शेतकरी कर्जमाफी, रोजगार निर्मिती याबाबतची लोकांत खदखद आहे.

विद्यमानांना पुन्हा संधी हा भाजपचा एक अजेंडा असला तरी त्यात वयाचा फॅक्‍टर असू शकतो. सत्तरी पार आमदारांनी विश्रांतीचा मुद्दा चर्चेत आल्यास शिवाजीराव नाईक आणि विलासराव जगताप यांच्यासाठी चिंता वाढू शकेल. शिराळ्यात सत्यजित देशमुखांसाठी उमेदवारीचा मार्ग अजून खुला असल्याचे त्यांचा गट सांगतो. वंचितचे नेते गोपीचंद पडळकर यांची जतमध्ये चाचपणी आणि आता भाजप प्रवेशाचे संकेत जगतापांची चिंता वाढवणारे आहेत.

पलूस-कडेगावमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, तासगाव-कवठेमहांकाळमध्ये अजितराव घोरपडे, सांगलीत सुधीर गाडगीळ यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद मागितला. आता तासगावमध्ये संजयकाकांच्या पत्नी ज्योती पाटील, सांगलीत माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर हेही आशीर्वाद मागत आहेत. जतमध्ये पाच इच्छुक आहेत. इस्लामपुरात गटबाजी उफाळून आलीय. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना  बगल देऊन गौरव नायकवडी यांचे नाव पुढे आणले आहे. शिराळ्यात सम्राट महाडिक शड्डू ठोकताहेत. 

खानापूर शिवसेनेकडे असल्याने भाजपच्या हालचाली नाहीत, मात्र युती तुटली तर आमदार अनिल बाबर भाजपचे उमेदवार असू शकतात. भाजपने मशागत दमदार केली आहे, वातावरणही चांगले आहे, आता पेरणी आणि उगवण कशी होते, याकडे लक्ष असेल. कारण, काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला आहे.  तो पुन्हा मजबुतीचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी भाजपची एकजूट दिसते का, नेते पैरा फेडतात का, याकडे लक्ष असेल.

स्वबळावरही सज्जता
राज्यात युती झाली नाही तरी जिल्ह्यात भाजपकडे ताकदीने आठही चेहरे आहेत. काँग्रेसमधून सत्यजित देशमुख आणि डाव्या चळवळीतून वैभव व गौरव नायकवडी असे बडे नेते भाजपकडे येताहेत. ही जमेची बाजू. एकेका मतदार संघात दोन-दोन ताकदीचे उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी चढाओढही दिसू लागली आहे. त्यातून काही ठिकाणी बंडाची शक्‍यता नाकारता येत नाही.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP strong in Sangli on import leaders