भाजपला पाठिंब्याचा निर्णय माझाच - संग्राम जगताप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

नगर - 'महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक आणि मी स्वत: घेतला आहे. त्यात पक्षाच्या वरिष्ठ पातळीपासून स्थानिक नेत्यांचाही काहीही संबंध नाही. केवळ नगरच्या विकासासाठी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला,'' असे आमदार संग्राम जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

नगर - 'महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक आणि मी स्वत: घेतला आहे. त्यात पक्षाच्या वरिष्ठ पातळीपासून स्थानिक नेत्यांचाही काहीही संबंध नाही. केवळ नगरच्या विकासासाठी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला,'' असे आमदार संग्राम जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

राज्य आणि देश पातळीवर भाजपवर सातत्याने टीका करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेसाठीच भाजपला पाठिंबा देऊन नवा "नगर पॅटर्न' तयार केल्याची टीका कालपासून सुरू आहे. त्यावरून पक्षादेश डावलल्याबद्दल "राष्ट्रवादी'च्या सर्व नगरसेवकांना नोटिसा बजावल्याचेही प्रदेशाध्यक्षांपासून राज्य पातळीवरील नेत्यांनी स्पष्ट केले. मात्र, तरीही हे नेते "भाजप-राष्ट्रवादी' युतीमुळे टीकेचे लक्ष्य ठरले. या पार्श्‍वभूमीवर आमदार जगताप यांनी आज भूमिका स्पष्ट केली.

जगताप म्हणाले, 'महापालिका निवडणूक "राष्ट्रवादी'ने सर्व ताकदीनिशी लढविल्याने दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या. परंतु, महापालिकेची स्थिती त्रिशंकू झाली. सत्तास्थापनेसाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. महापौर निवडणुकीसाठी "राष्ट्रवादी'ने संख्याबळ जमविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॉंग्रेस आणि अन्य काही नगरसेवकांना बरोबर घेऊनही संख्याबळ जुळत नव्हते. त्यानंतर "राष्ट्रवादी'च्या सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. भाजपची केंद्र व राज्यात सत्ता आहे. त्याचा उपयोग करून शहराला मोठ्या प्रमाणात निधी मिळेल. पहिल्या महिन्यात शंभर कोटींचा निधी आणण्याचा विश्‍वास भाजप नगरसेवकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला.''

भाजपला बाहेरून पाठिंबा
जगताप म्हणाले, 'भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय माझाच होता. याबाबत पक्षीय पातळीवरून विचार होणे साहजिक आहे. तो त्यांचा अधिकारच आहे. कार्यकर्ता म्हणून खुलासा देणे माझे काम आहे; परंतु पक्षाने अद्याप वैयक्तिकरीत्या मला नोटीस दिलेली नाही. या प्रकारची युती देशात व राज्यात अनेक ठिकाणी आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्येही अशी युती आहे. या संदर्भात भाजपच्याही कोणत्याही नेत्याबरोबर चर्चा झालेली नव्हती. "राष्ट्रवादी' महापालिकेत लाभाचे एकही पद घेणार नाही. बाहेरून पाठिंबा देऊन सत्तेवर अंकुश ठेवण्याचे काम करू.''

Web Title: BJP Support Decission Sangram Jagtap Politics