लोकसभेआधी विधानसभेसाठी लगीनघाई! 

लोकसभेआधी विधानसभेसाठी लगीनघाई! 

सातारा - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी जिल्ह्यातील विधानसभेच्या बुरूजांना धडका देण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. मात्र, लोकसभेसाठी भक्कम शिलेदार दिल्याशिवाय भाजपच्या धुरिणांना विधानसभेचे मनसुबे प्रत्यक्षात आणणे जिकिरीचे होणार आहे. 

राज्यपातळीवर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कॉंग्रेस व राष्ट्रवादीने आघाडीची चर्चा पूर्णत्वास नेली आहे. त्यानंतर मतदारसंघनिहाय उमेदवार निवडीची प्रक्रियाही सुरू करत लोकसभेच्या रणांगणात आघाडी घेतली आहे. मात्र, मागील निवडणुकीत युतीच्या माध्यमातून लोकसभेला चांगले यश मिळविणाऱ्या भाजप-शिवसेनेची युती अद्याप तळ्यात-मळ्यात आहे. युती होणारच म्हणणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे आता विरोधी पक्षांना स्वतंत्र लढा, असा अनाहुत सल्ला देत आहेत. त्यामुळे लढाई दोन महिन्यांवर आली असतानाही अद्याप जनतेसमोर भाजप स्पष्ट चित्र देऊ शकलेली नाही. त्यातून लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण व्हायला मदत होत आहे. 

विधानसभेसाठीच तयारी 
ऐनवेळी युती की स्वबळ यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार आहे. तशीच स्थिती राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातही पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप वर्ष बाकी आहे तर, दोन महिन्यांत लोकसभेची आचारसंहिता लागू होईल. अशा स्थितीत लोकसभेच्या दृष्टीने जिल्ह्यात वातावरण तयार करण्याऐवजी भाजपने विधानसभा मतदारसंघांवरच लक्ष केंद्रित केल्याचे चित्र दिसते. कोंढाण्याआधी रायबाच्याच लग्नाच्या तयारीत वरबाप आणि वऱ्हाडी गुंतल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

पाच मतदारसंघांवर लक्ष 
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, सातारा, कोरेगाव, माण या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांमध्ये चंद्रकांतदादांचे दौरे वाढले आहेत. विकासकामे दिली जात आहेत. दुसरीकडे वाई मतदारसंघासाठीही चाचपणी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा "किसन वीर'वर कार्यक्रम होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 

भाजपचा उमेदवार कोण? 
विधानसभानिहाय डावपेचांची आखणी चांगली सुरू आहे. मात्र, पहिल्यांदा तोंड द्याव्या लागणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने भाजप काय भूमिका घेणार, कोणता चेहरा समोर आणणार, हे अद्याप लोकांसमोर आलेले नाही. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी विधानसभांबरोबर लोकसभेच्या अनुषंगानेही पक्षाचे बुथपातळीपर्यंत नेटवर्क तयार करण्याचे काम केले आहे. परंतु, लोकांसमोर वेळेत चेहरा जाणेही आवश्‍यक असते. तो गेला नाही तर, या संघटनांचा पक्षाला यशापर्यंत नेण्यासाठी पाहिजे तेवढा उपयोग करून घेता येत नाही. 

उदयनराजेंवरच सर्व भिस्त 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या "हो'- "ना' वरच भाजपची भिस्त असल्याचे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांकडून उदयनराजेंचे झालेले कौतुक, भाजपच्या मंत्र्यांकडून देऊ केली जाणारी मदत यातून हेच सूचीत होते. दुसरीकडे उदयनराजे राष्ट्रवादीशी असलेली जवळीक तुटत चालल्याचे अजिबात दाखवत नाहीत. ती कशी वाढेल, यासाठीच त्यांचे प्रयत्न दिसतात. त्यामुळे भाजपचा दुसरा सक्षम उमेदवार नाही काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या यशावरच विधानसभेची गणिते अवलंबून असतील. लोकसभा गेल्यावर किंवा सक्षम लढत न झाल्यास विधानसभेचे यशही मृगजळच ठरू शकते. 

"आरपीआय'साठी उदयनराजेंचा डाव? 
खासदार उदयनराजे भोसले हे चांगलेच मुरब्बी राजकारणी बनले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेटवर्कबरोबर त्यांच्या नेत्यांची नाराजी या दोन्हींची त्यांना चांगलीच माहिती आहे. त्यामुळेच पक्षाचे तिकीट मिळाले तरी, दुसऱ्या पक्षातून मातब्बर रणांगणात येऊ नये, याचीही ते काळजी घेतात. गेल्या वेळी राज्यात कुणालाही जमली नाही, अशी खेळी त्यांनी रिपब्लिकन पक्षाला साताऱ्याची जागा सोडण्यासाठी खेळली. सर्वपक्षीय हितसंबंधाचा त्यांनी पुरेपूर फायदा करून घेतला होता. आताही ते भाजपबरोबर सर्वांशीच जवळीक असल्याचे चित्र उभे करत आहेत. त्यामुळे त्यांचीही जवळीक "रिपाइं'ला जागा मिळवून देण्यासाठी तर नाही ना, असा प्रश्‍न निर्माण होतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com