भाजप करणार "महाजनादेश'तून शक्तिप्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

 वाईत रविवारी जंगी स्वागत; सातारा, कऱ्हाडला मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा

सातारा : भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विविध विकासकामे जनतेपर्यंत पोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. येत्या रविवारी (ता. 15) सातारा जिल्ह्यात वाई येथे यात्रेचे स्वागत आणि सातारा आणि कऱ्हाड येथे जाहीर सभा होणार आहेत. यात्रेनिमित्ताने भारतीय जनता पक्ष आपली ताकद दाखविण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचे जंगी नियोजन करण्यात आले आहे. 
 

भारतीय जनता पक्षाने गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात केलेली विकासकामे आणि राबविलेल्या लोकाभिमुख योजनांची माहिती जनतेपर्यंत पोचवून त्यातून विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महाजनादेश यात्रा सध्या राज्यभर जात आहे. येत्या रविवारी (ता. 15) पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्‍यातून शिंदेवाडी, सुरूर फाटा येथून वाईत दुपारी दोन वाजता यात्रेचे आगमन होणार आहे. वाईत जिल्हा भाजपतर्फे यात्रेचे जंगी स्वागत होईल. त्यासाठी वाईचे भाजपचे नेते मदन भोसले यांनी जय्यत तयारी केली आहे. वाईतून कडेगावमार्गे पाचवडवरून यात्रा साताऱ्यात येईल. दुपारी तीन वाजता येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होईल.

सभेनंतर यात्रा कऱ्हाडकडे मार्गस्थ होईल. साताऱ्यातून उंब्रज, मसूरमार्गे कऱ्हाडला जाईल. दुपारी साडेचार वाजता कऱ्हाडात दत्त चौकात जाहीर सभा होईल. त्यानंतर यात्रेचा कऱ्हाडात मुक्काम राहील. 16 सप्टेंबरला यात्रा सकाळी साडेनऊ वाजता कऱ्हाडातून मार्गस्थ होण्यापूर्वी मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधतील.

तेथून मलकापूर, वाठार, पेठमार्गे इस्लामपूरला रवाना होईल. सातारा जिल्ह्यात दोन दिवस यात्रा असणार आहे. या कालावधीत जिल्हा भाजप व जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. साताऱ्यात माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कऱ्हाड उत्तरमधील मनोज घोरपडे, विठ्ठल-रुक्‍मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर या नेत्यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचे तेथील नियोजन होणार आहे. कऱ्हाडातील सभेत भाजपकडून मोठे शक्तिप्रदर्शन होणार आहे.
यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात दोन दिवस भाजप आपली ताकद दाखविणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will showcase power from "Mahajandesh" Yatra