लाभार्थ्यांचा लाभ घेणार भाजप!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

सातारा - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाजप सरकार आता नव्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहे. त्यामध्ये मतांची बेरीज करण्यासाठी भाजपने आतापासूनच सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना आपलेसे करण्याचे अभियान सुरू केले आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत ‘लाभार्थी संपर्क अभियान’ राबवून त्याचा लाभ घेण्यासाठी भाजप जोमाने काम करत आहे.

सातारा - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाजप सरकार आता नव्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहे. त्यामध्ये मतांची बेरीज करण्यासाठी भाजपने आतापासूनच सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना आपलेसे करण्याचे अभियान सुरू केले आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत ‘लाभार्थी संपर्क अभियान’ राबवून त्याचा लाभ घेण्यासाठी भाजप जोमाने काम करत आहे.

लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत, तर विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामध्ये गत चार वर्षांत राबविलेल्या योजनांचा फायदा करून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने नेटकी तयारी केली आहे. मंत्री, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांना ‘लाभार्थी संपर्क अभियाना’तून राजकीय ताकद वाढविण्यासाठी सक्रिय केले आहे. प्रत्येक गाव, वाड्यावस्त्यांपर्यंत भाजपचे जाळे घट्ट करण्यासाठी त्याचा पुरेपर वापर केला जात आहे. 

भाजपने चार वर्षांत राबविलेल्या योजनांमध्ये किती लाभार्थ्यांनी लाभ घेतला, याची गावनिहाय यादी बनविली जात आहेत. त्यांना हे कार्यकर्ते भेटून हा लाभ भाजप सरकारमुळे मिळाला, हे सांगून त्यांची ‘मतां’ची बेरीज केली जात आहे. शिवाय, त्यांना भाजप सरकारच्या विविध योजनांची माहितीही दिली जाणार आहे. त्याची जबाबदारी विशेषतः युवा मोर्चावर देण्यात आली आहे.

अभियानासाठी जिल्हा, तालुका, मंडल, गाव, मतदान केंद्र स्तरावर नियोजन केले जात आहे.

‘टी-२०’चा तंत्र-मंत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’चा फायदा गत निवडणुकीत भाजपने प्रभावीपणे उठविला आहे. आता त्यात बदल करून ‘टी-२०’ चे नवे प्रचाराचे तंत्र-मंत्र भाजपने पुढे आणले आहे. प्रत्येक कार्यकर्ता घराघरांत जाऊन चहा घेत २० कुटुंबांत भाजप सरकारने केलेली विकासकामे, योजनांची माहिती देणार असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. 

सध्या कोणत्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही, असा नवकार्यकर्ता व युवा-युवती भाजपशी जोडत आहोत. ‘वन बूथ टेन यूथ’ हा अजेंडा असला तरी जेथे भाजपची ताकद जास्त आहे, तेथे ‘वन बूथ २५ यूथ’चा अजेंडा ठेवून तसे प्रयत्न केले जात आहेत. ‘लाभार्थी संपर्क अभियान’ प्रभावीपणे राबवून भाजपची ताकद वाढवत आहोत.
- सुदर्शन पाटस्कर, राज्य सचिव, युवा मोर्चा, भाजप

Web Title: BJP will take advantage of beneficiaries Politics