तासगावात विजयासह भाजपने खोलले खाते

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

विशेष म्हणजे दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पश्‍चात तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत काय होणार याकडे राज्याचे लक्ष होते. तिथे खासदार संजय पाटील यांनी बाजी मारली असून 18 पैकी 10 जागांवर विजय मिळवला आहे. तेथे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सावंत विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीला 8 जागांवर विजय मिळवता आला.

सांगली - जिल्ह्यात पाच नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात कॉंग्रेसने चार ठिकाणी सत्ता काबीज करत नंबर वन स्थान पटकावले असून राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. माजी ग्रामविकास मंत्री, तथा राष्ट्रवादीचे मातब्बर नेते जयंत पाटील यांना इस्लामपूरात विकास आघाडीने 13 जागांसह नगराध्यक्षपदावर विजय मिळवून 31 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला.

तासगावात भाजपने सत्ता काबीज करीत पहिल्यांदाच कमळ चिन्हावर स्थानिक स्वराज्य संस्थेत झेंडा फडकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. कॉंग्रेसला विटा, पलूस या पालिकांत तर कडेगाव नगरपंचायतीत एकहाती तर खानापूरमध्ये शिवसेनेच्या मदतीने सत्ता मिळाली.

राज्यात गाजत असलेल्या इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीला 14 जागांवर विजय मिळाला असला तरी सत्ता 50-50 अशी स्थिती झाली. विरोधी विकास आघाडीचे 13 उमेदवार विजयी झाले असून 1 अपक्षाने बाजी मारली. शिवाय, नगराध्यक्षपदी आघाडीचे निशीकांत भोसले-पाटील विजयी झाल्याने सध्याची स्थिती 14-14-1 अशी आहे. इस्लामपूरकरांनी जयंतरावांच्या शिलेदारांना यावेळी नाकारल्याचे चित्र स्पष्ट झाले.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी कडेगाव नगरपंचायत आणि पलूस नगरपालिकेत सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले. भाजपने कडेगावमध्ये 7 जागांवर विजय मिळवून चांगली लढत दिली, मात्र सत्ता मिळवण्याचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे स्वप्न भंगले. पलूसमध्ये कॉंग्रेसला 12, रयत पॅनेला 4 तर भाजपला 1 जागा मिळाली.

विशेष म्हणजे दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पश्‍चात तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत काय होणार याकडे राज्याचे लक्ष होते. तिथे खासदार संजय पाटील यांनी बाजी मारली असून 18 पैकी 10 जागांवर विजय मिळवला आहे. तेथे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सावंत विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीला 8 जागांवर विजय मिळवता आला. या ठिकाणी कॉंग्रेसला खाते खोलता आले नाही.

कवठेमहांकाळ नगरपंचायतीत माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार सुमनताई पाटील व सगरे गटाला 12 जागा मिळवून सत्ता काबीज केली. या ठिकाणी भाजपच्या संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पॅनेलला 6 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
आष्टा नगरपालिकेत राष्ट्रवादीला सत्ता कायम राखण्यात यश मिळाले असले तरी विद्यमान नगराध्यक्षा मंगला शिंदे यांचा दारुण पराभव झाला आहे. विरोधी आघाडीने 3 तर अपक्ष 3 जणांनी राष्ट्रवादीला धक्का दिला. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या स्नेहा माळी विजयी झाल्या.

Web Title: bjp wins tasgaon municipal council election