भाजपची यंग ब्रिगेड रोवणार का पाय? 

भाजपची यंग ब्रिगेड रोवणार का पाय? 

अन्य पक्षांतील प्रमुख युवा नेत्यांना आपल्याकडे खेचण्यात भारतीय जनता पक्ष जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला भाजपच्या यंग ब्रिगेडकडून तगडे आव्हान निर्माण होऊ शकते. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी ही यंग ब्रिगेड पक्षाचे सेनापती असतील. त्यादृष्टीनेही भाजपची पायाभरणी सुरू आहे. जिल्ह्यात पाय रोवण्यात भाजप किती यशस्वी होईल, हे पाहणे आगामी काळात रंजक ठरेल. 

केंद्र व राज्यातील सत्तेचा फायदा घेत भाजपकडून राजकीय खेळी खेळल्या जात आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीत त्याची चुणूक दिसून आली. कोणताही गाजावाजा न करता जिल्ह्यात भाजपचे दोन नगराध्यक्ष झाले. आता हाच डाव जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत खेळला जात आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेसमधील नाराजांना आपलेसे करून भाजपकडून जिल्ह्यात राजकीय ताकद वाढवली जात आहे. त्याचबरोबर या निवडणुकीच्या निमित्ताने जुन्या युवा नेत्यांनाही राजकारणात सक्रिय करण्यात पक्षाला चांगले यश आलेले दिसते. त्यामुळे भाजपने अन्य पक्षांपुढे आव्हान उभे केले आहे. 

उमेदवार देण्यात यश 
जिल्हा परिषदेच्या 59 गटांत व पंचायत समित्यांच्या 110 गणांत भाजपने उमेदवार दिले आहेत. त्यातील किमान दहा ते 15 गट व पंचायत समित्यांच्या 20 ते 25 गणांतून विजयश्री मिळवण्याची पक्षाची व्यूहरचना दिसते. अर्थात हे यश मिळविण्याची मदार आहे ती यंग ब्रिगेडवरच! 

आगामी विधानसभेचे लक्ष 
भाजपकडून कार्यरत असलेल्या यंग्र ब्रिगेडवर नजर मारली तर बहुतांश युवा नेते हे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार असू शकतील. त्यादृष्टीनेच पक्षाचीही पायाभरणी सुरू असल्याचे दिसते. हे युवा नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण करतील, अशी स्थिती आहे. भाजपने आक्रमकतेवर भर दिल्यामुळे युवा नेत्यांनाही चांगलेच बळ मिळाले आहे. त्यातून त्यांच्यासाठी पोषकच वातावरण तयार होत आहे. केंद्र व राज्यातील सत्ता, विकासकामे आदींचा विचार करता ही यंग्र बिग्रेड म्हणजे राष्ट्रवादी व कॉंग्रेससाठी धोक्‍याची घंटा ठरू शकते. 

ग्रामीण भागातूनही बळ 
पहिल्यापासून भाजपला शहरी भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता ग्रामीण भागातही या पक्षाला बळ मिळताना दिसते. जिल्ह्याचा विचार केला तर आतापर्यंत भाजपला सरासरी दहा टक्के मते मिळत होती. हा आकडा 40 टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. ग्रामीण भागातील या अनुकूलतेचा फायदा घेऊन पक्षाचे संघटना बांधणीकडे विशेष लक्ष दिसते. 

ही आहे भाजपची यंग्र ब्रिगेड! 
पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर (कऱ्हाड उत्तर), अतुल भोसले (कऱ्हाड दक्षिण), मनोज घोरपडे (सातारा), महेश शिंदे (खटाव), अनिल देसाई (माण), सह्याद्री कदम (फलटण), संतोष जाधव (कोरेगाव), ऍड. भरत पाटील (पाटण), अमित कदम (महाबळेश्‍वर), दीपक पवार (जावळी) आदींनी त्या-त्या तालुक्‍यांची जबाबदारी संभाळत संघटन बांधणी सुरू केली आहे. वाईतून विकास शिंदे व सचिन घाडगे यांचेही प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात फक्त खंडाळा तालुक्‍यात भाजप कमजोर दिसतो. या तालुक्‍यातही युवा नेत्यासाठी भाजपची शोध मोहीम सुरू आहे. 

पालिका निवडणुकीत भाजपचे दोन नगराध्यक्ष झाले. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही आम्ही चांगले यश मिळवू. येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून किमान पाच आमदार निवडून आणण्याचे ध्येय पक्षाने ठेवले आहे. 
- विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भाजप 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com