राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पोखरण्याची भाजपची खेळी

उमेश बांबरे
मंगळवार, 23 मे 2017

जिल्ह्यात भाजप प्रवेशाचे वारे; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे लक्ष 

सातारा - राजकीय अस्तित्व टिकविण्यासोबतच सत्ताधारी पक्षासोबत राहून अडकलेली कामांचा निपटारा होण्यासाठी जिल्ह्यात सध्या भाजप प्रवेशाचे वारे सुरू आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी (ता. २९) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. कऱ्हाडमधील कार्यक्रमात काँग्रेस, राष्ट्रवादीतील दोन डझन कार्यकर्ते भाजपत प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. 

जिल्ह्यात भाजप प्रवेशाचे वारे; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे लक्ष 

सातारा - राजकीय अस्तित्व टिकविण्यासोबतच सत्ताधारी पक्षासोबत राहून अडकलेली कामांचा निपटारा होण्यासाठी जिल्ह्यात सध्या भाजप प्रवेशाचे वारे सुरू आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी (ता. २९) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. कऱ्हाडमधील कार्यक्रमात काँग्रेस, राष्ट्रवादीतील दोन डझन कार्यकर्ते भाजपत प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. 

पालिका निवडणुकीतील यशानंतर भाजपतील पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी सातारा जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले. गेली १५ वर्षे सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या ताब्यात आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा, तर काँग्रेसचे दोन आमदार, तसेच विधान परिषदेचे तीन आमदार आहेत. राज्यात सत्ता भाजप- सेना युतीची असली, तरी जिल्ह्यात मात्र, सत्ता राष्ट्रवादीची असे राजकीय गणित आहे. 

चंद्रकांत पाटील, गिरीश बापट यांची मोर्चेबांधणी
राष्ट्रवादीच्या साताऱ्यातील सत्तास्थानाला सुरुंग लावण्याचे काम भाजपने सुरू केलेले दिसते. त्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट या दोघांची रणनीती महत्त्वपूर्ण ठरली आहे.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपचा एक तरी खासदार व एक- दोन आमदार जिल्ह्यात निवडून आणण्यासाठी या दोन मंत्र्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादीतील नाराजांना ‘कमळा’च्या प्रेमात पाडून त्यांच्या माध्यमातून विधानसभेची व्यूहरचना भाजपचे नेते आखत आहेत. त्याला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे बळ मिळू लागले आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे घडामोडी
नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा दौरा झाला. हा तसा राजकीय कमी, शासकीय जास्त असा दौरा होता; पण ओन्ली राजकारणासाठी मुख्यमंत्री येत्या सोमवारी कऱ्हाडच्या दौऱ्यावर येत आहेत. येथील कार्यक्रमात साधारण काँग्रेस व राष्ट्रवादीतील दोन डझन आजी- माजी पदाधिकारी भाजपत प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. 

नव्या- जुन्यांची मोट बांधणार
सत्तेशिवाय कोणतीही बाब शक्‍य नाही. विरोधी पक्षात राहून वेळ वाया घालविण्यापेक्षा सत्तेत राहून काही तरी पदरात पाडून घेण्याच्या अपेक्षेने राष्ट्रवादी व काँग्रेसमधील नाराज भाजपत प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. या सर्वांना बळ देण्याचे काम मुख्यमंत्र्यांसह चंद्रकांत पाटील हे करणार आहेत. नव्या, जुन्यांची मोट बांधून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पोखरण्याची राजकीय खेळी भाजप खेळत आहे. त्याला जिल्ह्यातील जनता किती साथ देणार यावर भाजपचे यशाचे गणित अवलंबून आहे. 

निष्ठावंतांच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा
भारतीय जनता पक्षातील जुन्या व निष्ठावंतांना मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा आहेत. पक्षात नव्याने येणाऱ्यांचे स्वागत करा; पण निष्ठावंतांनाही कोठे तरी संधी द्या, अशी अपेक्षा या सर्वांकडून व्यक्त होत आहे. मुळात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रत्येकाला लगेच सत्तेत किंवा पदावर संधी मिळणे तसे अवघडच; पण तरीही नव्याने भाजपमध्ये गेलेल्यांना आपण सत्ताधारी पक्षात आलो, आपले काहीही अडणार नाही, एवढेच समाधान राहणार आहे.

Web Title: BJP's decision to nurture the NCP bastion