सीमाप्रश्नी आमदार राजेश पाटील काय म्हणाले ?

Black Day Rally In Belgaum MLA Rajesh Patil Comment
Black Day Rally In Belgaum MLA Rajesh Patil Comment

बेळगाव - सीमाभाग महाराष्ट्राला जोडून संयुक्त महाराष्ट्राची संकल्पना पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सीमाभागातील मराठी भाषकांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोचविण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज उठवणार आहे. तसेच बेळगावचा एक कार्यकर्ता समजून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदारांसमवेत केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आश्‍वासन चंदगडचे नवनिर्वाचित आमदार राजेश पाटील यांनी दिले.

काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीनंतर शुक्रवारी (ता. १) मराठा मंदिरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी अध्यक्षस्थानी होते. खजिनदार प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर व सरचिटणीस मालोजी अष्टेकर व्यासपीठावर होते.

ते पुढे म्हणाले, भाषावर प्रांतरचनेवेळी महाराष्ट्राचा बहुतांश भाग कर्नाटकात अन्यायाने डांबण्यात आला आहे. तेव्हापासून सीमाभागातील मराठी जनता महाराष्ट्रात जाण्यासाठी धडपडत आहे. आता चौथी पिढी या लढ्यात सक्रिय आहे. मात्र, कर्नाटक सरकारकडून लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात असून मराठी बांधवावर अन्याय केला जात आहे. आजच्या फेरीतील तरुणांचा सळसळता उत्साह पाहता हा प्रश्‍न लवकरच सुटेल यात शंका नाही. सीमाप्रश्‍न मला ज्ञात असून बेळगावचा एक कार्यकर्ता म्हणून सीमाप्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी मी प्रयत्नशील असणार आहे. सीमावासीयांच्या भावना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोचविणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

अध्यक्ष दळवी म्हणाले, ‘‘गेली ६३ वर्षे आम्ही महाराष्ट्रात जाण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे. अशी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार करत आहे. मात्र, येथील मराठी माणसाने पुन्हा जिद्दीने रस्त्यावर उतरून आपली ताकद व इच्छा दाखवून दिली आहे. सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात असून या खटल्याला वेगळे वळण देण्यासाठी राज्य शासनाकडून अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र, सीमाप्रश्‍न सुटेस्तोपर्यंत लढाई चालू ठेवणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.’’ त्यानंतर माजी आमदार किणेकर, माजी महापौर अष्टेकर यांनीही विचार व्यक्त केले. सभेला सीमाभागातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वाभिमान गहाण टाकू नका

हिंदूच्या नावाखाली मराठी भाषिकांत फूट पाडण्याचे काम राष्ट्रीय पक्ष करीत आहेत. भगव्या ध्वजाचा अवमान केला जातो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दगडफेक होते, तेव्हा राष्ट्रीय पक्षातील तथाकथित हिंदुत्त्वादी मूग गिळून गप्प बसलेले असतात. हिंदू धर्माचे कातडे परिधान केलेल्या अशा नेत्यांपासून मराठी युवकांनी सावध राहावे. स्वाभिमान गहाण ठेवू नये, अस बोलून युवकांना एकी राखण्याचे आवाहन युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी केले. रिंगरोड व बायपासाठी समितीने आंदोलन उभारले आहे. मात्र, राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी ब्रसुद्धा काढला नसल्याची जाणीव त्यांनी करुन दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com