अंध अमोलची ‘ज्योती’ जीवनसाथी

संजय खूळ
सोमवार, 25 जून 2018

इचलकरंजी - स्टेट बॅंकेत अधिकारी असूनही अंध असल्याने त्याला योग्य पत्नी मिळत नव्हती, मात्र कर्नाटकातील गोकाक येथील ज्योती पिरडी या युवतीने डोळसपणे येथील अमोल बापूराव व्हनुगरे याला जीवनसाथी निवडला. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर अमोलने मिळविलेल्या यशाला आयुष्यात या विवाहाने एक वेगळी किनार मिळाली.

इचलकरंजी - स्टेट बॅंकेत अधिकारी असूनही अंध असल्याने त्याला योग्य पत्नी मिळत नव्हती, मात्र कर्नाटकातील गोकाक येथील ज्योती पिरडी या युवतीने डोळसपणे येथील अमोल बापूराव व्हनुगरे याला जीवनसाथी निवडला. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर अमोलने मिळविलेल्या यशाला आयुष्यात या विवाहाने एक वेगळी किनार मिळाली.

अमोल हा जन्मत:च अंध होता. मात्र महत्त्वकांक्षी आणि कष्ट करण्याची जिद्द होती. त्यामुळेच त्याने पदव्युत्तर अभ्यास पूर्ण करून प्राध्यापक होण्यासाठी बीएडची परीक्षाही पास झाला. शिक्षकाची नोकरी शोधत असतानाच स्टेट बॅंकेत जागा निघाल्या. अमोलने अपंग प्रवर्गातून यासाठी अर्ज केला. आईने त्यासाठी त्याला मदत केली. बॅंकेसाठी आवश्‍यक असणारी सर्व पुस्तके अमोलच्या आईने वाचून दाखवली. हुशार असलेल्या अमोलने स्टेट बॅंकेच्या परीक्षेत यश मिळवले. सध्या अमोल कोल्हापूर येथील स्टेट बॅंकेच्या बसंत बहार टॉकीजलगत असलेल्या शाखेत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करीत आहे. मुलगा अंध असला तरी त्याला मुलगी ही सदृढ असावी व तिला व्यंग नसावे अशी आई वडिलांची इच्छा होती. आजच्या तरुणींच्या वाढत्या अपेक्षेमुळे राष्ट्रीयीकृत बॅंकेत अधिकारी असलेल्या अमोलला अनेक जणांनी केवळ अंध आहे म्हणून नाकारले. वर्षापूर्वीच अमोलच्या आईचे निधन झाले. त्यामुळे अमोलला सक्षम सहचारिणीची गरज होती. अमोलने या मिळविलेल्या यशाला त्याला चांगली पत्नी मिळावी अशी त्यांच्या कुटुंबीयातील लोकांची इच्छा होती.

कर्नाटकातील गोकाक येथील श्रीमती शकुंतला बसवराज पिरडी यांची मुलगी ज्योती हिने अमोलची धडपड सोशल मीडियावर पाहली होती. हे स्थळ चालून आल्याने ज्योतीने आनंदाने अमोलचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. ज्योती यांच्या वडिलांची निधन झाल्याने ती मामाकडे राहत होती. घरातील सर्वांनी ज्योतीच्या निर्णयाचे आनंदाने स्वागत करीत अमोल हिच्याशी येथील जिवाजी सांस्कृतिक भवनमध्ये थाटामाटात विवाह करून दिला. अमोलच्या जीवनात ज्योतीच्या रूपाने आणखी एक आनंदाची किनार मिळून गेली.

कष्टाने शिकत यश मिळविले. नोकरीही मिळवली मात्र आयुष्यात एक समजूतदार पत्नीची गरज होती. ज्योती हिच्या रूपाने खरोखरच माझ्या आयुष्याला आणखी बळकटी मिळाली.
- अमोल व्हनुगरे

Web Title: blind amol jyoti pardi marriage life motivation