इस्लामपूर येथे सभापती-उपसभापतीनी ठोकले गटविकास अधिकारी कार्यालयास कुलूप

इस्लामपूर येथे सभापती-उपसभापतीनी ठोकले गटविकास अधिकारी कार्यालयास कुलूप

इस्लामपूर - पंचायत समितीच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अर्थात गटविकास अधिकारी ऑफिसला सभापती व उपसभापतीनीच आज कुलूप ठोकले. तीन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळूनही गटविकास अधिकाऱ्यांनी या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली नसल्याच्या निषेधार्थ सभापती सचिन हुलवान व उपसाभपती नेताजी पाटील यांनी हा प्रकार केला. गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे रुजू झाल्यापासून त्यांच्या एकूणच कार्यपद्धती विषयी नाराजीचा सूर होता, तोही यातून उघड झाला आहे.

शशिकांत शिंदे हे २७ जानेवारीपासून २० फेब्रुवारीपर्यंत रजेवर आहेत. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त चार्ज शिराळचे गटविकास अधिकारी अनिल बागल यांच्याकडे दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून रस्ते, स्वच्छता, घरकुल हप्ता, शिक्षक पगार, आदी तीन कोटी रुपयांची ५२ प्रकरणे मंजुरी मिळूनही प्रशासकीय मान्यता नसल्याने पेंडीग आहेत. लोकांना या कामाकरिता हेलपाटे मारावे लागत आहेत.

गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी पालकमंत्री योजनेची २७ प्रकरणांना मंजुरी दिली आहे; परंतु काही अवधी जाऊनही या प्रकरणाचा कागद ही गटविकास अधिकाऱ्यांच्या टेबलावरून हाललेला नाही. काही दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे या प्रकरणांच्या कामांना दिवाळीनंतर मुहूर्त सापडणार आहे. त्यामुळे मंजुरी मिळूनही अतिरिक्त गटविकास अधिकारी प्रशासकीय मान्यता देत नसल्याने लोकांची कामे थांबली आहेत. "तुम्हाला जबाबदारी घ्यायची नसेल तर तुम्ही चार्ज का घेतला?" असा प्रश्न उपस्थित करत आज सभापती व उपसभापती यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला कुलूप लावले. 

सहायक असून काय उपयोग ?
येथे सहाय्यक गटविकास अधिकारी सुभाष सावंत कार्यरत असताना जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी शेजारील तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांना चार्ज द्यायला नको होता. अनिल बागल यांचा चार्ज काढून दुसऱ्या अधिकाऱ्यांना चार्ज द्यावा व ही कामे मार्गी लावावीत, अन्यथा कार्यालयाचे कुलूप काडून देणार नाही, असा इशारा यावेळी सभापती व उपसभापतींनी दिला आहे.

वारंवार कुलुप लावण्याचा प्रकार...
यापूर्वी ही लोकांची कामे होत नसल्याच्या तक्रारीमुळे सभापती व उपसभातीनी रोजगार हमी कार्यालयाला कुलूप लावले होते. गेल्या आठवड्यात मुलींच्या सायकल वाटपावरून समाज कल्याणच्या कार्यालयालाही कुलूप लावल्याचा प्रकार घडला होता.  त्यामुळे पंचायत समितीत वारंवार असे प्रकार घडत असल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com