बोर्डाचा डॉमिन आयडी खासगी संस्थेच्या नावावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

कोल्हापूर - बारावीच्या बनावट गुणपत्रिकेमुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या ढिसाळ कारभाराचा नमुना पुढे आला आहे. वेबसाईटवरील निकालाचे बटण मंडळाच्या नावाऐवजी खासगी संस्थेच्या ताब्यात देऊन मंडळाने घोळ घातला आहे. मुंबईस्थित अधिकार फाउंडेशनचे अध्यक्ष शकील शेख यांच्या प्रसंगावधानामुुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. मंडळाने यासंबंधी अज्ञातावर तक्रार दाखल केली आहे.

शेख यांनी राज्य मंडळाच्या मुंबई, तसेच नागपूर येथील संकेतस्थळ तपासले असता तेथे त्यांना अशाप्रकारचा निकाल दिसून आला नाही. मात्र कोल्हापूर विभागीय मंडळाची sscboardkolhapur.in या संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक टाकला असता निकालच त्यांना नजरेस पडला. शेख यांनी मंडळाचे सहायक सचिव बाळासाहेब शेटे यांना यासंबंधी माहिती दिली असता त्यांना अल्तमश खान याच्या नावाने असलेला निकाल उत्तीर्ण म्हणून नजरेस पडला. शेटे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी खान याचा निकाल बनावट असल्याचे सांगितले. संकेतस्थळावर निकाल कसा दिसतो यावर शेटे यांनी वेबसाईट विकासकाकडून अहवाल मागविल्याचे सांगितले.

शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून घोळाची माहिती दिली आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाच्या संकेतस्थळाचा डॉमिन आयडी गायत्री चव्हाण स्पेस इन्फोटेक यांच्या नावाने नोंदणी आहे.

डॉमिन आयडी मंडळाच्या नावाने हवा होता. शेख यांनी संकेतस्थळावरील निकाल. डॉमिन आयडीची नोंदणी व इतर पानांची छायाचित्रे घेतली आहेत. बनावट गुणपत्रिकेमुळे भ्रष्टाचार झाला आहे. अधिकारी आणि काही लोकांच्या संगनमतामुळे परीक्षा न घेता बारावीचे निकालपत्र बनवून दिले जात आहे. शिक्षणाचा व्यवसाय करणाऱ्या कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळ व गायत्री चव्हाण स्पेस इन्फोटेक यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, असेही शेख यांनी पत्रात म्हटले आहे.

हॅकिंग प्रमाण वाढले
दहावी आणि बारावीच्या निकालासंबंधी मंडळाची बेबसाईट हॅक करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रकासह निकालही काही वेबसाईटवर नजरेस पडतो. गुणपत्रिका अथवा प्रमाणपत्राची ऑनलाइन प्रिंट काढून ती नोकरी अथवा व्यवसायासाठी जोडली जात आहे. दोन्ही परीक्षांचा निकाल चार-पाच वर्षांपासून ऑनलाइन जाहीर केला जातो. निकालाची तारीख जाहीर झाली, की संकेतस्थळ जाहीर केले जाते. मात्र, मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाचा डॉमिन आयडी स्वतःच्या नावावर न घेता खासगी संस्थेच्या नावावर नोंदणीचा उद्योग मंडळाने केला आहे.

Web Title: board domin id on private organisation name