नावाडी धुळप्पाने वाचवले हजारो प्राण...

Boatman Dhulappa saved thousands of lifes
Boatman Dhulappa saved thousands of lifes

इचलकरंजी : तो एक छोट्याशा गावातील छोटासा नावाडी. हातावरचं पोट. नदीच्या या तीरावरची माणसं त्या तीरावर नेणं एवढंच त्याचं आयुष्य. एरवी गावगाड्यात नगण्य असणारा हा माणूस महापुराच्या अस्मानी संकटात देवदूत ठरला. आपल्या वल्हवण्याच्या होडीतून वाहतूक करून त्याने तब्बल 7 हजार माणसं महापुराच्या दाढेतून बाहेर काढली. गावाचं नाव आलास. ता. शिरोळ, जि. कोल्हापूर. श्री गुरु दत्तात्रेयाच्या नरसोबाच्या वाडीच्या अर्थात नृसिंहवाडीजवळचं गाव. नावाड्याचं नाव धुळाप्पा पुजारी. त्या प्रलयंकारी महापुरात गावकऱ्यांना धुळाप्पाच्या रुपानं दत्तगुरुच भेटले आणि त्यांचे प्राण वाचले.

आठवड्यापूर्वी गावाला चहुबाजूनं पुरानं वेढलं. प्रशासन आणि एनडीआरएफला हे गाव सापडेना. अशा वेळी आपल्या छोट्या होडीतून वल्हवत त्यानं तब्बल 7 हजार लोकांना बाहेर काढलं. त्याला सोबत होते मुलगा योगेश आणि गजानन. आठवडाभर हे बापलेक अहोरात्र अडीच किलोमीटर पुराच्या पाण्यातून ये-जा करत नागरिकांची वाहतूक करत होते.


शिरोळ तालुक्यातील आलास हे गाव कृष्णा नदीच्या तीरावर वसलं आहे. कृष्णेला महापूर आला असताना गाव पाण्यानं वेढलं गेलं. शिरोळ तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली होती. अशावेळी प्रशासन मदत तरी कोणत्या गावाला करायची या पेचात होतं. अशा वेळी प्रशासनाची वाट न पाहता धुळप्‍पा यांनी आपल्या नावेतून गावातील नागरिकांना बाहेर सोडण्याचा निर्णय घेतला.

2005च्या महापुरातही त्यांच्या वडिलांनी गावकऱ्यांना असं महापुराच्या संकटातून बाहेर काढलं होतं. यावेळचं संकट कितीतरी मोठं होतं. धुळाप्पांच्या दोन मुलांनी त्यांना साथ दिली. अनेक गावांमध्ये एनडीआरएफ आणि लष्कराच्या बोटीमध्ये बसण्यास नागरिक घाबरत होते. अशा प्रसंगी आलासच्या गावकऱ्यांचा मात्र धुळाप्पांवर शंभर टक्के विश्वास होता. हा विश्वास सार्थ ठरवत धुळाप्पा आणि त्यांच्या मुलांनी बचाव मोहीम फत्ते केली.
आता स्थिरस्थावर झाल्यानंतर गावकऱ्यांनी धुळाप्पा कुटुंबाचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com