खुनानंतर ऍड. राजेश कांबळेंचे केले पाच तुकडे! 

The body of Advocate Kamble who had disappeared for four days was found
The body of Advocate Kamble who had disappeared for four days was found

सोलापूर : गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ऍड. राजेश श्रीमंत कांबळे (वय 45, रा. ब्रह्मचैतन्यनगर, नवीन आरटीओ ऑफिसजवळ, विजयपूर रोड, सोलापूर) यांचा बुधवारी दुपारी मृतदेह सापडला. त्यांचा खून करून मृतदेहाचे पाच तुकडे करण्यात आले आहेत. या प्रकरणी संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी इंडी, कोल्हापूर या ठिकाणी पथके रवाना केली आहेत. 
ऍड. कांबळे यांचा खून केल्या प्रकरणात संशयावरून पोलिस संजय ऊर्फ बंटी खरटमल याचा शोध घेत आहेत.

लष्कर परिसरातील पांडुरंग वस्तीमधील खरटमल याच्या घरात ऍड. कांबळे यांच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. ऍड. कांबळे हे 8 जूनपासून बेपत्ता होते. कोर्टात पक्षकारांना भेटून येतो असे सांगून ते घराबाहेर पडले होते. ते घरी परत आले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. ते सापडत नसल्याने कुटुंबीयांनी विजयपूर नाका पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ऍड. कांबळे यांचा कोणीतरी घातपात केला असण्याची शंका सोलापूर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी व्यक्त केली होती. ऍड. कांबळे यांचा शोध घेण्याबाबत प्रभारी पोलिस आयुक्त बापू बांगर यांच्याकडे निवेदन दिले होते. 

एकीकडे पोलिसांकडून ऍड. राजेश कांबळे यांचा शोध सुरू असतानाच कुटुंबीयांनीही आपली धडपड चालूच ठेवली होती. कांबळे कुटुंबीय पूर्वी लष्कर परिसरातील शिक्षक हौसिंग सोसायटीमध्ये राहण्यास होते. बुधवारी सकाळी ऍड. कांबळे यांचे भाऊ मिलिंद कांबळे हे शिक्षक हौसिंग सोसायटी परिसरात पोचले. त्या ठिकाणी चौकशी करत असताना आधीपासून ओळख असलेल्या संजय खरटमल याच्याविषयी संशय व्यक्त करण्यात आला. मिलिंद कांबळे व त्यांचे नातेवाईक खरटमलच्या घरी पोचले. घर बंद होते, पण आतून दुर्गंधी येत होती. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. देवघरात दोन काळ्या रंगाच्या पोत्यात ऍड. कांबळे यांचे मुंडके, दोन हात, धड, दोन पाय असा पाच तुकड्यांतील मृतदेह आढळून आला. घटनास्थळी कोयता, चॉपर ही हत्यारे मिळून आली. 

ऍड. कांबळे यांचे 2006 मध्ये लग्न झाले होते. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, आठ वर्षांचा प्रिन्स, पाच वर्षांची आरोही अशी दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. ऍड. कांबळे यांचा मोबाईल 'आउट ऑफ कव्हरेज' लागत असून कन्नड भाषेतून संवाद ऐकू येत आहेत. पोलिसांनी तपासाला गती दिल्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी सांगितले. रात्री उशिरा ऍड. कांबळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

  • कांबळेंच्या अंगावर होते सोने! 
  • ऍड. राजेश कांबळे 15 वर्षांपासून वकिली क्षेत्रात 
  • घटनास्थळावर सापडली नाही ऍड. कांबळेंची दुचाकी 
  • ऍड. कांबळे यांच्या अंगावर होते साडेपाच तोळे सोने 
  • दोन दिवसांपासून संशयित संजय खरटमल गायब 
  • खासगी रुग्णालयात तो सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता 
  • खरटमलच्या घरात लावल्या होत्या अगरबत्त्या
  • घरात बोकड आणि मांजराला ठेवले होते बांधून 
  • पैशासाठी किंवा अंधश्रद्धेतून हा प्रकार केल्याची चर्चा 


कलबुर्गी येथील केस द्यायची आहे असे सांगून संजय खरटमल याने माझ्या भावाला घरी बोलावून घेतले. तिथे त्याचा खून केला. मृतदेह नष्ट करण्यासाठी पाच तुकडे केले. संजय याने भावाला मारून दीड लाखांचे सोन्याचे दागिने काढून घेतले आहेत. पोलिसांनी त्याचा लवकरात लवकर शोध घ्यावा. 
- मिलिंद कांबळे, ऍड. कांबळे यांचे भाऊ 


ऍड. कांबळे यांचा घातपात झाल्याचा संशय आम्ही व्यक्त केला होता. पोलिसांनी परिस्थितिजन्य पुरावे गोळा करावेत. या घटनेमुळे वकिलांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता बार असोसिएशनच्या हॉलमध्ये शोकसभा आयोजित केली आहे. 
- ऍड. संतोष न्हावकर, अध्यक्ष, सोलापूर बार असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com